मोदींमध्ये जबाबदारी घेण्याची पात्रताच नाही, प्रियांका गांधींची लातुरात दणदणीत सभा

काँग्रेसने 70 वर्षांत काही केले नाही असा पंठशोष करून सांगता. तुम्ही काही तरी करावे म्हणूनच तुम्हाला पंतप्रधान पदावर बसवले, पण जबाबदारी घेण्याची पात्रताच मोदींमध्ये नाही, असा हल्लाबोल काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी केला.

लातूर जिह्यातील महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्या प्रचारासाठी काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर आमदार अमित देशमुख, धीरज देशमुख, यांच्यासह महाविकास आघाडीचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

भाषणात प्रियांका गांधी यांनी भाजपवर टीका केली. आमच्या घरात तीन पंतप्रधान झाले. या देशाने अनेक टोलेजंग पंतप्रधान पाहिले. अटलबिहारी वाजपेयी, डॉ. मनमोहन सिंग यांचा काळही आपण पाहिला. कोणत्याही पंतप्रधानाने पदाचा गैरवापर केला नाही, परंतु नरेंद्र मोदी यांनी ज्या पद्धतीने पदाचा गैरवापर केला आहे, असे त्या म्हणाल्या. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाचा स्तर घसरवला असल्याचा आरोपही त्यांनी केला. 70 वर्षांत काँग्रेसने काही काम केले नाही, असा आरोप आमच्यावर मोदी करतात. गेल्या दहा वर्षांत तुम्ही काय केले, याचा हिशेब द्या, असेही त्या म्हणाल्या.

पाच किलो रेशनचा डांगोरा

सध्या देशाला अनेक समस्या भेडसावत आहेत. महागाई, बेरोजगारीने देश त्रस्त आहे, परंतु ना मोदी त्यावर काही बोलतात ना भाजप. शेतकरी आत्महत्या करत आहेत, परंतु त्यांना याचे काही वाटत नाही. पाच किलो रेशन देतो म्हणून फुशारकी मिरवतात. शेतकरी आत्महत्या करत आहे, शेतमालाला भाव नाही, शेती साहित्यावर 18 टक्के जीएसटी लावला आहे. शेतकऱयांच्या हातात खडकू पडत नाही, पण सरकारला शेतकऱयांबद्दल आस्था वाटत नाही, असा आरोप त्यांनी केला. बडय़ा उद्योगपतींचे 16 लाख कोटींचे कर्ज मोदी सरकारने माफ केले, पण शेतकऱयांच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर मोदींना कमी करता आला नाही, असा शालजोडीतलाही टोला त्यांनी हाणला.

साठी बुद्धी नाठी…

प्रत्येक घरात सर्वांना ज्ञानाचे डोस पाजणारे एक अंकलजी असतात. एक दिवस हेच अंकलजी उठले आणि म्हणाले, सावधान व्हा. एक राजकीय पक्ष एक्स-रे मशीन घेऊन तुमच्या घरात येईल. तुमची सर्व बचत, एवढेच काय महिलांचे मंगळसूत्रही काढून भलत्याच कुणाला तरी देईल. तुम्ही हसाल आणि म्हणाल, साठी बुद्धी नाठी झालीय… पंतप्रधान मोदी आपल्या पदाची प्रतिष्ठा विसरून नेमके हेच करत आहेत, असा टोला प्रियांका यांनी लगावला.

महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी करून सरकार पाडलं. ज्यांना तुम्ही मत दिलं, ते आमदार पक्षांतर करत आहेत. लोकशाहीची हत्या केली जातेय.