पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा जीवनपट उलगडला, दादरच्या सावरकर भवनात विशेष सांस्कृतिक कार्यक्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याचा जीवनपट दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर भवनात उलगडला. निमित्त होते राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित केलेल्या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे दूरदृष्टीपूर्ण प्रशासन, समाजहितकारी कार्य, धार्मिक सहिष्णुता, लोककल्याणकारी निर्णय तसेच स्त्राr शक्तीच्या आदर्श नेतृत्वाचा प्रवास कथक नृत्याच्या माध्यमातून मांडण्यात आला.

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या कार्यक्रमातून त्यांच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाची संकल्पना आणि दिग्दर्शन ज्येष्ठ कथ्थक नृत्यांगना रंजना फडके यांचे होते.

सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित या विशेष कार्यक्रमात संगीत, निवेदन, कथक नृत्याच्या सादरीकरणातून इतिहासातील महत्त्वपूर्ण प्रसंग सादर करण्यात आले. या वेळी नृत्यातून अहिल्याबाई होळकर यांच्या प्रेरणादायी कार्याची ओळख नवीन पिढीला व्हावी आणि त्यातून नवी पिढी जागरुक करण्याचा मानस असल्याचे ज्येष्ठ कथक नृत्यांगना आणि गुरू रंजना फडके यांनी सांगितले. या नृत्यांची प्रस्तुती नृत्यांगना दिव्या राव, शीतल कपोले, काजल वराडकर, सुरभी शिंत्रे, आर्या कुलकर्णी आणि सहकलाकारांनी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उर्वी सुकी यांनी केले. या कार्यक्रमाला अभिनेत्री मीना नाईक, कथक गुरू राजश्री शिर्के यांच्यासह कथक नृत्यातील अनेक दिग्गज गुरू उपस्थित होते.