‘अकाली दलाला’ इंडिया आघाडीत सामावून घेण्याबाबत कोणतीही चर्चा नाही, आपच्या खासदाराचे विधान

इंडिया आघाडीची तिसरी बैठक मुंबईत होत असून या बैठीकसाठी देशभरातील 28 राजकीय पक्षांचे प्रमुख नेते, प्रतिनिधी मुंबईत दाखल व्हायला लागले आहे. भाजपच्या विरोधात असलेल्या, आणि आमच्यासोबत येण्यासाठी तयार असलेल्या पक्षांशी इंडिया आघाडी चर्चेसाठी तयार आहे असे सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी म्हटले आहे.

मुंबईतील बैठकीपूर्वी पंजाबमधील अकाली दल हा पक्ष देखील या आघाडीत सामील होणार का असा प्रश्न विचारला जात होता. आपचे खासदार राघव चढ्ढा यांनी न्यूज 18 शी बोलताना यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, अकाली दल इंडिया आघाडीत समाविष्ट करून घेण्यासाठी ना कुठली चर्चा झाली आहे ना कुठली चर्चा होईल.

इंडियाच्या मुंबईतील बैठकीपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले होते की, आघाडी करत असताना प्रादेशिक पातळीवरील गणितेही पाहणं गरजेचे आहे. अकाली दलाला यायचे असेल तर ते येऊ शकतात मात्र पंजाबमध्ये सत्तेत असलेला आप आणि काँग्रेस पक्ष हे इंडिया आघाडीचा भाग आहेत. त्यांच्याशी चर्चा केल्याशिवाय कोणताही निर्णय घेतला जाऊ शकत नाही. आघाडीत बेबनाव होईल असा कोणताही निर्णय घेणं चुकीचे असेल.