माझा बाप बिल्डर असता तर? अपघाताच्या ठिकाणी घेतली निबंध स्पर्धा

अल्पवयीनाने बेदरकारपणे मोटार चालवीत दोघांचा जीव घेतल्याची घटना कल्याणीनगरमध्ये घडली होती. त्या बदल्यात बालन्याय मंडळाने सुरुवातीला आरोपी मुलाला निबंध लिहण्याची शिक्षा सुनावत जामीन मंजूर केला होता. त्याचा निषेध करण्यासाठी पुणे युवक काँग्रेसने आज राज्यस्तरीय निबंध स्पर्धा आयोजित केली होती. ज्या ठिकाणी अपघात झाला, त्याच परिसरात आयोजित स्पर्धेत शेकडो जणांनी सहभाग घेतला होता.

निबंध लेखनासाठी ‘माझी आवडती कार (पॉर्शे, फरारी)’, ‘दारूचे दुष्परिणाम’, ‘माझा बाप बिल्डर असता तर…’, ‘मी खरंच पोलीस अधिकारी झालो तर…’, ‘अश्विनी आणि अनिशचे मारेकरी कोण?’ हे विषय देण्यात आले होते. या स्पर्धेसाठी वयोगटही मर्मावर बोट ठेवणारा होता. 17 वर्षे 8 महिने पासून 58 वर्षांपर्यंतच्या नागरिकांनी निबंध स्पर्धेत सहभाग घेतला होता. कल्याणीनगर परिसरात बॉलर पबसमोर निबंध स्पर्धा पार पडली.

विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात राज्यभरातील मुले शिक्षणासाठी येतात, मात्र पब संस्कृतीमुळे शहराला गालबोट लागले आहे. अप्रिय घटना घडल्यानंतर महापालिका, उत्पादन शुल्क विभागासह पोलिसांना जाग येते, हे दुर्दैवी आहे. सर्व दोषींविरुद्ध कठोर कारवाई होईपर्यंत विविध स्वरूपाचे आंदोलन केले जाणार आहे.
– रवींद्र धंगेकर, आमदार