जो काकांचा झाला नाही, तो तुमचा काय होणार? रवींद्र मिर्लेकर यांचा अजित पवारांना टोला

दादा तुम्हाला परवडेल का? जो काकांचा झाला नाही तो तुमचा काय होणार? ज्या काकांनी त्याला राजकारणात आणून एवढे मोठे केले, अनेक वर्षे मंत्रिपदे भोगायला दिली; परंतु तोच दादा उपकार विसरून विरोधात उभा आहे, असा टोला अजित पवारांचे नाव न घेता शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेते रवींद्र मिर्लेकर यांनी लगावला. मतदारांना दम देण्याचे काम चालू आहे. तुम्ही मला मते दिली नाही तर तुम्हाला विकास निधी देणार नाही, असाही सज्जड दम दादांकडून मतदारांना दिला जात आहे, असेही रवींद्र मिर्लेकर यांनी सांगितले.

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ भोर येथे आयोजित केलेल्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी भोर विधानसभा संपर्कप्रमुख सुनील धाकड, जिल्हाप्रमुख शंकर मांडेकर, महिला जिल्हा संघटक संगीता पवळे, तालुकाप्रमुख (पश्चिम विभाग) हनुमंत कंक, कुणाल साळुंखे, प्रसाद शिंदे, अनिल भेलके, राम गायकवाड, भरत साळुंखे, अर्जुन चव्हाण, सोपान कंक, अमोल बरदाडे आदी उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना रवींद्र मिर्लेकर म्हणाले, देश सुरक्षित नाही, मणिपूरमध्ये महिलांवर अत्याचार होत आहेत. परंतु, पंतप्रधानांना या ठिकाणी भेट देण्यास वेळ नाही. गेल्या दहा वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी बेरोजगार तरुणांना दरवर्षी दोन करोड नोकऱ्या देणार होते. म्हणजे या दहा वर्षांत मोदींनी 20 करोड नोकऱ्या तरुणांना देणे अपेक्षित होते. परंतु, असे न होता त्यांनी उद्योगधंदे विकले. यामुळे रोजगार देण्याऐवजी लाखो-करोडो तरुण बेरोजगार झाले.