लोकप्रतिनिधींच्या निधीतून बांधलेल्या वास्तूंच्या भाडय़ामध्ये कपात करा, शिवसेनेची विधानसभेत मागणी 

आमदार, खासदारांच्या निधीतून व्यायायशाळा, अभ्यासिका, ध्यानधारणा पेंद्र, ज्येष्ठ नागरिक संघ आदी वास्तू बांधल्या जातात. त्या वास्तू जनतेच्या सेवेसाठी असल्याने त्यांना व्यावसायिक दराने भाडे आकारण्याऐवजी निवासी दराने भाडे आकारणी करावी आणि त्यातही कपात केली जावी, अशी जोरदार मागणी आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या आमदारांनी केली. यासंदर्भात आठ दिवसांत बैठक घेऊन कार्यवाही केली जाईल असे आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी दिले. भाजपच्या देवयानी फरांदे यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. यावेळी झालेल्या चर्चेत शिवसेना गटनेते अजय चौधरी, मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी भाग घेतला. आमदार, खासदारांच्या निधीतून उभारलेल्या वास्तूंचे भाडे वेळेवर न भरल्यास महानगरपालिकेकडून जप्तीची नोटीस काढण्यात येते. त्यामुळे सुधारित भाडेदर निश्चित करण्याची मागणी चौधरी यांनी केली. तर अशा वास्तूंना निवासी भाडेदर लावले जावेत, अशी मागणी सुनील प्रभू यांनी केली.