माजी आमदार रमेश कदम यांना दिलासा

आर्थर रोड तुरुंगातील जेलर व वैद्यकीय अधिकाऱ्याला धमकी दिल्याच्या प्रकरणात माजी आमदार रमेश कदम यांना दिलासा मिळाला आहे. या प्रकरणातील मूळ तक्रारदार तत्कालीन तुरुंग वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल घुले यांनी गुरुवारी जबाब फिरवला. रमेश कदम यांनी मला शिवीगाळ वा धमकी दिली नव्हती, असे डॉ. घुले यांनी सांगितले. त्याआधारे सत्र न्यायालयाने त्यांना फितूर घोषित केले.

अण्णाभाऊ साठे महामंडळ गैरव्यवहार प्रकरणात तुरुंगात असताना रमेश कदम यांनी 24 फेब्रुवारी 2016 रोजी आर्थर रोड तुरुंगातील जेलर व वैद्यकीय अधिकाऱ्याला शिवीगाळ करीत धमकी दिल्याचा आरोप आहे. जे. जे. रुग्णालयात नेण्यासाठी गाडी उपलब्ध केली नाही याचा राग मनात धरून कदम यांनी धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी विशेष सत्र न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यापुढे सुनावणी झाली.