रोहित वेमुला क्लोजर रिपोर्टवर तेलंगणातील पोलिसांचं प्रश्नचिन्ह, पुढील चौकशीचे संकेत

हैदराबादचा विद्यार्थी रोहित वेमुलाच्या आत्महत्येप्रकरणी तेलंगणा पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टनंतर काही तासात, राज्याचे पोलीस महासंचालक (डीजीपी), रवी गुप्ता यांनी या अहवालात विसंगती असल्याचा आरोप केला आणि या प्रकरणात न्यायालयाच्या हस्तक्षेपाची विनंती करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

पुढील तपासाची परवानगी देण्याची विनंती आपण दंडाधिकाऱ्याला करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

इंडिया टुडेनं यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे. अधिकाऱ्यानं सांगितलं की, ‘या अहवालाबाबत काही शंका आहेत. आम्ही न्यायालयाला या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती करू’.

‘मृत रोहित वेमुलाच्या आई आणि इतरांनी काही शंका व्यक्त केल्यामुळे, या प्रकरणाचा पुढील तपास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकरणाच्या पुढील तपासाला परवानगी देण्याची विनंती करणारी याचिका न्यायालयात दाखल केली जाईल’, असंही ते म्हणाले.

‘या प्रकरणातील तपास अधिकारी हे सहाय्यक पोलीस आयुक्त, माधापूर होते आणि या प्रकरणातील अंतिम बंद अहवाल गेल्या वर्षी नोव्हेंबर 2023 पूर्वी केलेल्या तपासाच्या आधारे तयार करण्यात आला होता’, अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे.

तपास अधिकाऱ्यांनी इतर माहिती उच्च अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली नाही का ते आम्ही शोधून काढू, असं ते म्हणाले.

शुक्रवारी, तेलंगणा पोलिसांनी या प्रकरणातील क्लोजर रिपोर्टमध्ये दावा केला की वेमुला हा दलित नव्हता आणि त्याची ‘खरी जात’ शोधली जाईल या भीतीने 2016 मध्ये आत्महत्या करून त्याचा मृत्यू झाला.

क्लोजर रिपोर्टमध्ये पोलिसांनी पुराव्याअभावी आरोपींना क्लीन चिट दिली आहे.

दरम्यान, रोहित वेमुलाच्या कुटुंबानं शुक्रवारी सांगितलं की ते तेलंगणा पोलिसांच्या 2016 च्या आत्महत्येच्या क्लोजर रिपोर्टविरोधात कायदेशीररित्या लढतील.

रोहितचा भाऊ राजा वेमुला यांनी असंही सांगितलं की ते या प्रकरणावर तेलंगणाचे मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी यांना भेटण्याची योजना आखत आहेत, अशी माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिली आहे.

पोलीस प्रमुख गुप्ता म्हणाले की, या प्रकरणातील तपास अधिकारी हे सहायक पोलीस आयुक्त, माधापूर होते आणि केलेल्या तपासाच्या आधारे अंतिम क्लोजर रिपोर्ट नोव्हेंबरपूर्वी तयार करण्यात आला होता.

अंतिम क्लोजर रिपोर्ट अधिकृतपणे 21 मार्च रोजी न्यायाधिकारी न्यायालयात तपास अधिकाऱ्यानं दाखल केला होता, असं देखील त्यांनी निवेदनात म्हटलं असल्याचा उल्लेख आहे.