सामना अग्रलेख – बदमाशांचा शेवटचा अड्डा!

राजकारण हा बदमाशांचा शेवटचा अड्डा असतो, असे जगन्मान्य सत्य आहे. ते खरे होताना या महान भारतभूमीवर दिसत आहे. विठ्ठलाच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना याच अड्डय़ावर प्रतिष्ठा मिळते तेच बेइमान पुन्हाबा पांडुरंगा, आम्हाला सांभाळून घ्याअशा विनवण्या करतात. बदमाशांच्या अड्डय़ावरची ही शिकवणी सर्वत्र अनैतिकतेचा चिखल करीत आहे. एकाधिकार, राज्यघटनेचे विडंबन त्यातून निर्माण झालेली राजकीय माफियागिरी हेच भारताचे भविष्य होणार असेल तर एक दिवस या देशाचे डबके झाल्याशिवाय राहणार नाही. चिखल सर्वत्रच आहे. तो संपवायचा कसा? बदमाशांचा शेवटचा अड्डा लोकशाही मार्गाने उद्ध्वस्त केल्याशिवाय ते शक्य होणार नाही.

चिखलातून कमळ उगवावेत यासाठी भारतीय जनता पक्ष जी मेहनत घेत आहे त्याचे वर्णन करायला शब्द अपुरे पडावेत. त्यासाठी ते जागोजाग चिखलच चिखल करीत आहेत. महाराष्ट्रातील चिखल तसाच ठेवून भाजपने आता उत्तर प्रदेशात चिखल केला. योगी आदित्यनाथांसारखा लोकप्रिय, भगवे वस्त्रधारी नेता तेथे मुख्यमंत्री असताना भाजपला त्या रामभूमीतही चिखल करावा लागतोय. याचा अर्थ असा की, 2024 साली बहुमतास लागणारी 283 ‘कमळे’ फुलणार नाहीत हीच भीती त्यांना सतावत आहे. सुहेलदेव भारतीय समाज पार्टीचे ओमप्रकाश राजभर यांनी भारतीय जनता पक्षाशी निकाह लावला आहे. भाजपने आपल्या वॉशिंग मशीनमध्ये त्यांना घालून धुऊन स्वच्छ केले व आता त्यांची पापे धुऊन निघाली. राजभर यांचा पक्षच एनडीएचा घटक बनल्याने त्या पक्षाचे आमदार कुख्यात अब्बास अन्सारी यांनाही भाजपने ‘पवित्र’ करून घेतले आहे. हे अब्बास अन्सारी म्हणजे अनेक खून, अपहरण, खंडणी वगैरे प्रकरणांत आजन्म कारावासाची शिक्षा भोगत असलेले माजी खासदार मुख्तार अब्बास अन्सारी यांचे चिरंजीव. उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील माफिया डॉन अतिक अहमद व सिवान येथील मुख्तार अन्सारी यांना मातीत मिळविण्याचा चंग मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बांधला होता. अतिक अहमद यांची हत्या झाली, तर अन्सारी यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली गेली. त्यांचे आमदारपुत्र अब्बास अन्सारी यांच्यावर ईडी, सीबीआय, पोलिसांच्या कारवाया सुरू आहेत. पण आता ओमप्रकाश राजभर भाजपच्या चरणी लीन झाल्यामुळे अन्सारी यांना कोणत्या व कशा सवलती मिळतात ते पाहायला हवे. मुख्तार अन्सारी यांचा तेथील मुस्लिम समाजावर प्रभाव आहे. भाजपला उत्तरेत मुसलमानांची मते हवीत व त्यासाठीच त्यांनी हा नवा चिखल निर्माण केला आहे. भाजपास सत्ता हवी आहे व ती मिळवण्यासाठी तो कोणतीही तडजोड करायला तयार आहे. जनाची नाही, मनाची नाही अशा अवस्थेला पोहोचलेल्या भाजपने देशाच्या

राजकीय संस्कृतीचा बट्टय़ाबोळच

केला आहे. आता ओमप्रकाश राजभर भाजपच्या तंबूत सामील झाले, पण काही महिन्यांपूर्वी हेच राजभर गरजले होते की, “प्रत्यक्ष परमेश्वराने आज्ञा केली तरी भाजपचा हात पकडणार नाही. मोदी व शहांना पुन्हा कायमचे गुजरातला पाठवले नाही तर मी माझ्या आईबापाची औलाद नाही.’’ तेच राजभर आज निर्लज्जपणे भाजपवासी झाले. महाराष्ट्रात अशा राजकीय निर्लज्जपणाने आधीच चिखल केला आहे. अजित पवार, भुजबळ, मुश्रीफ वगैरे लोकांनी भाजपबाबत आधी केलेली विधाने व आताचे त्यांचे वर्तन मेळ खात नाही. या मंडळींविरुद्ध भाजप नेत्यांनीही यापूर्वी वारेमाप आरोप केले होते. एक निश्चित आहे की, भारतीय जनता पक्षाचे हात बळकट करण्याचे काम जे लोक आज करीत आहेत त्यांना इतिहास माफ करणार नाही. तेजस्वी यादव यांना बिहारच्या मंत्रिमंडळातून वगळावे अशा बोंबा तेथे भाजपवाले मारीत आहेत. सीबीआयने एका आरोपपत्रात तेजस्वींचे नाव टाकले. त्यामुळे त्यांना मंत्रीपदावरून हटवावे ही मागणी तशी नैतिकतेस धरून असली तरी महाराष्ट्रासह अनेक राज्यांत भाजपने अनेक अपराध्यांना मंत्रीपदी विराजमान करून घेतले. त्यांचे राजीनामे मागून मागून जनता थकली. आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सर्मांपासून ते महाराष्ट्रातील अजित पवार, भुजबळ, मुश्रीफपर्यंत. यांची जागा तुरुंगात आहे, असे श्री. फडणवीस सांगत होते. मात्र आता त्या सगळ्यांची कमलपुष्पे करून मोदी-शहांच्या चरणी त्यांना अर्पण केले गेले आहे. उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र ही मोठी राज्ये आहेत व त्यातील लोकसभा जागांचा आकडा दिल्लीतील सत्तेचा सारीपाट बदलू शकतो. त्यामुळे मिळेल तो मार्ग स्वीकारून मोदी-शहा त्यांच्या अस्तित्वाची लढाई लढत आहेत. एक काळ होता, मोदी-शहांनी अनेक बलाढय़ नेत्यांचा आपल्या अहंकारी बाण्याने कचरा केला. स्वपक्षातील बलदंड नेत्यांना वनवासात पाठवले. अनेक पक्ष मोडले. भल्याभल्यांना दारात उभे केले. पण आज त्यांना अब्बास अन्सारी, राजभर, भुजबळ, मुश्रीफ यांच्या

काडीचाही आधार

लागतोय व त्यासाठी हिंदुत्वही बाजूला ठेवून ‘‘सब माफिया, भ्रष्टाचारी ‘कमळाबाई’ के’’ असेच धोरण त्यांना स्वीकारावे लागत आहे. जे राजभरसारखे लोक मोदी-शहांना कायमचे गुजरातला पाठवायला निघाले होते, त्यांची गरज भाजपास लागते. ज्या चिराग पासवान यांचा पक्ष फोडून कुटुंबातही दोन तुकडे केले त्या चिरागसाठीही मोदी-शहांनी पायघडय़ा अंथरल्या. अकाली दल, चंद्राबाबूंचा तेलगू देसम यांनाही डोळे मारून वेगळ्या प्रकारचा ‘लव्ह जिहाद’ करण्याची योजना दिसतेच आहे. याचा सरळ अर्थ असा की, ‘अब की बार चारसो पार’च्या गर्जना या 24 सालात प्रत्यक्षात उतरण्याची सुतराम शक्यता नाही व या सर्व बाहेरच्या खेळाडूंसह भाजप दोनशेच्या आत ‘ऑल आऊट’ होण्याचीच खात्री जास्त दिसत आहे. हे होऊ नये यासाठी मोदी-शहांचा आटापिटा सुरू आहे आणि त्यांनी संपूर्ण देशाच्या राजकारणाचा घाणेरडा चिखल करून ठेवला आहे. चिखलात कमळ फुलते हे खरे, पण चिखलात डुकरेही लोळतात. अनेकदा इतर जनावरेही त्या चिखलात तासन्तास रवंथ करीत बसून असतात हेसुद्धा तितकेच खरे. राजकारण हा बदमाशांचा शेवटचा अड्डा असतो, असे जगन्मान्य सत्य आहे. ते तंतोतंत खरे होताना या महान भारतभूमीवर दिसत आहे. विठ्ठलाच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना याच अड्डय़ावर मान, प्रतिष्ठा मिळते व तेच बेइमान पुन्हा विठ्ठलाच्या दारात जाऊन ‘बा पांडुरंगा, आम्हाला सांभाळून घ्या’ अशा विनवण्या व आर्जवे करतात. बदमाशांच्या अड्डय़ावरची ही शिकवणी सर्वत्र अनैतिकतेचा चिखल करीत आहे. भारताची एकता आणि अखंडता आज धोक्यात आल्यासारखे वातावरण आहे. हे एक आव्हान आहे. एकाधिकार, मनमानी, राज्यघटनेचे विडंबन व त्यातून निर्माण झालेली राजकीय माफियागिरी हेच भारताचे भविष्य होणार असेल तर एक दिवस या संपूर्ण देशाचे डबके झाल्याशिवाय राहणार नाही. चिखल सर्वत्रच आहे. तो संपवायचा कसा? बदमाशांचा शेवटचा अड्डा लोकशाही मार्गाने उद्ध्वस्त केल्याशिवाय ते शक्य होणार नाही.