नमिता गोखले यांना इंग्रजी भाषेचा पुरस्कार; किरण गुरव, प्रणव सखदेव,  संजय वाघ यांना साहित्य अकादमी

साहित्य क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठsच्या समजल्या जाणाऱया साहित्य अकादमीच्या 2021 सालच्या पुरस्कारांची आज घोषणा झाली. मराठी भाषेचा पुरस्कार किरण गुरव यांच्या ‘बाळूच्या अवस्थांतराची डायरी’ या लघुकथा लेखनाला जाहीर झाला. युवा साहित्य पुरस्कार लेखक प्रणव सखदेव यांच्या ‘काळेकरडे स्ट्रोक्स’ कादंबरीसाठी आणि बाल साहित्य पुरस्कार ‘जोकर बनला पिंगमेकर’ या संजय वाघ यांच्या पुस्तकाला मिळाला आहे.

साहित्य अकादमीचे अध्यक्ष चंद्रशेखर कम्बार यांच्या अध्यक्षतेखालील कार्यकारी मंडळाच्या बैठकीत 20 भाषांचे पुरस्कार जाहीर करण्यात आले.  एक लाख रुपये आणि ताम्रपट असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. मराठी भाषेसाठी लेखक किरण गुरव यांना जाहीर झाला. त्यासाठी सतीश आळेकर, वसंत पाटणकर, डॉ. रवींद्र शोभणे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. नमिता गोखले यांना ‘थिंग्ज टू लिव्ह बिहाइंड’ या कादंबरीसाठी इंग्रजी भाषेचा पुरस्कार मिळाला आहे. हिंदी भाषेसाठी दया प्रकाश सिन्हा पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या  ‘सम्राट अशोक’ या नाटकाच्या पुस्तकासाठी हा पुरस्कार आहे.

  लेखक प्रणव सखदेव यांना ‘काळेकरडे स्ट्रोक्स’ कादंबरीसाठी युवा पुरस्कार जाहीर झाला. 50 हजार रुपये आणि ताम्रपट असे पुरस्काराचे स्वरूप आहे. साहित्य अकादमीने एकूण 22 प्रादेशिक भाषांसाठी युवा पुरस्कार घोषित केले.  भास्कर चंदनशिवे, इंद्रजित भालेराव, नागनाथ कोतापल्ले यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

 साहित्य अकादमीने 22 बालसाहित्य पुरस्कारांची घोषणा केली.  मराठी भाषेचा बालसाहित्य पुरस्कार संजय वाघ यांना ‘जोकर बनला किंगमेकर’ या पुस्तकासाठी मिळाला. या पुरस्कारासाठी माधुरी पुरंदरे, श्रीकांत देशमुख, विश्वास पाटील धुले यांनी परीक्षण केले.

काळेकरडे स्ट्रोक्सया कादंबरीतून नव्या पिढीचे प्रश्न मांडले आहेत. 2000 नंतरच्या पिढीने उदारीकरणाची फळं चाखली आहेत. त्या पिढीचे बदलते जग, त्यातील नातेसंबंध, मानसिक  आंदोलनजगण्यातील तुटकपणा, त्यांची अस्तित्वादाची चिंता मांडायचा प्रयत्न केला.  आजच्या पुरस्काराने खूप आनंद झालाय. यानिमित्ताने नव्या लेखकांकडे लक्ष जाईल. आजचे प्रश्न मांडणाऱया, समकालीन लिहिणाऱया लेखनाकडे लक्ष वेधले जाईल.
प्रणव सखदेव

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून अभिनंदन

मराठी भाषा अभिजात आहेच. या आपल्या मायमराठीत वैविध्यपूर्ण साहित्यकृतींमधून आणखी समृद्ध  प्रवाह आणण्याचे महत्त्वाचे काम लेखक, साहित्यिक मोठय़ा उमेदीने करत असतात. त्यांच्या या लेखन प्रवासाला साहित्य अकादमी पुरस्कारामुळे आणखी बळ मिळते, असे नमूद करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लघुकथाकार किरण गुरव, कादंबरीकार प्रणव सखदेव आणि संजय वाघ यांचे अभिनंदन केले. मुख्यमंत्री म्हणाले, मायमराठीला अभिजात दर्जा मिळावा यासाठी आपण जागर सुरू केला आहे. हे यश उदयोन्मुख लेखकांसाठी प्रेरणा देत राहील आणि आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद आहे.