सलमान खान गोळीबार प्रकरण – शुटर्सना पिस्तूल देणाऱ्या आरोपीची कोठडीत आत्महत्या

अभिनेता सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपी आणि गँगस्टर अनमोल बिष्णोईचा पंटर अनुजकुमार थापन याने बुधवारी आत्महत्या केली. मुंबई पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेच्या कोठडीलगत असलेल्या टॉयलेटमध्येच त्याने गळफास घेतल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून त्याचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या वतीने करण्यात येणार आहे.

सलमानच्या वांद्रे येथील घरावर 14 एप्रिलच्या पहाटे गोळीबार झाला होता. तो गोळीबार करणाऱ्या सागर पाल आणि विक्की गुप्ता या दोघांना गुन्हे शाखेने गुजरातच्या भुज जिह्यातील एका मंदिरातून पकडले होते. त्यानंतर हा गोळीबार करण्यासाठी अनुज थापन आणि सोनू बिष्णोई या दोघांनी सागर आणि विक्कीला पिस्तूल आणि जिवंत काडतुसे आणून दिली होती असे तपासात समोर आले. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने पंजाबमध्ये जाऊन अनुज आणि सोनूला पकडून आणले होते. न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावल्यानंतर गुन्हे शाखेच्या पहिल्या मजल्यावरील लॉकअपमध्ये ठेवले होते. आज दुपारी 12-12.30 वाजता अधिकारी कोठडीची पाहणी करायला गेले असता अनुज टॉयलेटमध्ये गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याला लगेच ताब्यात घेऊन जी.टी. इस्पितळात नेण्यात आले; पण उपचार करण्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता. अनुज ज्या लॉकपमध्ये होता तेथे त्याच्याव्यतिरिक्त अन्य पाच आरोपी होते. अनुजने कपडय़ाच्या तुकडय़ाने गळफास लावून घेतला होता. तो कपडय़ाचा तुकडा त्याला कसा मिळाला. आरोपींना देण्यात येणारी चादर फाडून त्याने तो कपडा बनवला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

अनुजच्या मृतदेहाचे जे.जे. इस्पितळात दंडाधिकाऱ्यांसमोर इनपॅमेरा शवविच्छेदन केल्यावर सर्व आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्याच्या मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येईल.

बिष्णोई गँगविरोधात पुरावे जमा करण्यासाठी अनुज महत्त्वाचा दुवा होता

अनुज थापन हा गँगस्टर अनमोल बिष्णोई गँगशी थेट संपका&त होता. त्यामुळे बिष्णोई गँगची जास्तीत जास्त माहिती त्याच्याकडून मिळविण्याची संधी पोलिसांना होती, पण त्याने मृत्यूला कवटाळल्याने पोलिसांनाही हा मोठा धक्का आहे. सलमानच्या घरावर गोळीबार करण्यासाठी आरोपींना पिस्तूल आणि काडतुसे आणून देण्याचे काम अनुजने केले होते. अनुजविरोधात पंजाबमध्ये दोन गुन्हे दाखल असून त्यापैकी गोळीबाराचा एक गुन्हा गंगानगर पोलीस ठाण्यात दाखल आहे. त्याच गुह्यात बिष्णोई भावांचादेखील सहभाग आहे. त्यामुळे बिष्णोई गँगच्या म्होरक्यांविरोधात सबळ पुरावे जमा करण्यासाठी अनुज हा महत्त्वाचा दुवा होता. पण आता अनुजनेच आत्महत्या केल्याने पोलिसांची गोची होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गोळीबार प्रकरणात चौघांना अटक केल्यानंतर पोलिसांनी सर्वांवर ‘मोक्का’ लावला होता.

सीआयडी पथकाकडून कोठडीची पाहणी

सीआयडीच्या अधिकारी व पथकाने अनुजने आत्महत्या केली त्या कोठडीला लागून असलेल्या टॉयलेटची पाहणी केली. तसेच घटनेची माहिती घेतली. आयुक्तालयातील गुन्हे शाखेच्या लॉकअपमधील टॉयलेटमध्ये आरोपीने गळफास घेतल्याने आरोपींच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. एका गंभीर गुन्ह्यातील आरोपी टॉयलेटमध्ये जाऊन कपडय़ाच्या तुकडय़ाच्या सहाय्याने गळफास घेतो तरी तेथील गार्ड अथवा अधिकाऱ्यांना याबाबत कळून येत नाही. आरोपीकडे कपडय़ाचा तुकडा येतो कसा, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.