अंकुश चत्तर खून प्रकरणातील सात आरोपींना अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

अंकुश चत्तर (वय 35, रा. पद्मानगर, सावेडी) यांच्या खून प्रकरणातील सात आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. सोमवारी दुपारी अंकुश यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त देण्यात करण्यात आला होता. या प्रकरणी भाजप नगरसेवक स्वप्निल रोहिदास शिंदे (वय 40, रा. श्रमिक बालाजी चौक, नगर), अक्षय प्रल्हादराव हाके (वय 33, रा. नंदनवन नगर, सावेडी), अभिजित रमेश बुलाख (वय 33, रा. भिस्तबाग, नगर), महेश नारायण कुर्‍हे (वय 28, रा. साईनगर, वाघमळा, सावेडी), सूरज उर्फ विकी राजन कांबळे (वय 25, रा. भुतकवारवाडी, सावेडी), मिथून सुनील धोत्रे (वय 23, रा. पवननगर, भिस्तबाग सावेडी) व एक अल्पवयीन अशी आरोपींची नावे आहेत.

स्वप्निल शिंदे हा भाजपाचा नगरसेवक आहे. शनिवारी लहान मुलांचे भांडण झाल्याने अंकुश चत्तर हे मुलांचे भांडण सोडविण्यासाठी आले असता सात ते आठ आरोपी काळ्या रंगाच्या कारमधून आले. पूर्ववैमनस्यातून स्वप्निल शिंदे याने दिलेल्या चिथावणीवरुन अंकुश चत्तर यांना ठार मारण्याच्या उद्देशाने लोखंडी रॉड, काचेच्या बाटल्या, वायररोप व गावठी कट्टा घेऊन जोरजोरात आरडाओरडा करुन दहशत निर्माण केली. तसेच रस्त्यावर असणारे नागरिक आणि दुकानदारांवर धाक निर्माण करुन अंकुश चत्तर यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारुन जखमी केले. या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात भादवि कलम 307, 323, 324, 325, 326, 143, 147, 148, 149, 108 सह आर्मऍक्ट 3/25 म.पो.का.क.37 (1) (3)/135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. अंकुश चत्तर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने या गुन्ह्यात 302 हे वाढीव लावण्यात आले आहे.

गुन्हे शाखेच्या पथकाला सीसीटीव्ही फुटेच तपासताना काळ्या रंगाची कार नगर, शेवगाव, पैठण, बीडकीन मार्गे वाशिमकडे जाताना दिसली. पथकाने वाशिम येथे जावून आरोपींचा शोध घेतला तेथे हॉटेल गुलाटीच्या बाहेर ती काळ्या रंगाची कार दिसली. कारबाबत हॉटेलमध्ये चौकशी केली असता कारमधील काही व्यक्ती हॉटेलमध्ये राहण्यास आहेत, अशी माहिती पथकाला मिळाली. त्यानंतर पथकाने काही जणांना ताब्यात घेतले. त्यांनी त्यांचे नाव स्वप्निल शिंदे, अक्षय हाके, अभिजित बुलाख, महेश कुर्‍हे, सूरज कांबळे अशी असल्याचे सांगितले. गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले. गुन्हे शाखेच्या दुसर्‍या पथकाने रांजणी बेल्हे (ता. जुन्नर) येथून दोन जणांना ताब्यात घेतले. त्यामधील एकजण अल्पवयीन असून दुसर्‍याचे नाव मिथून धोत्रे असे आहे. या प्रकरणाचा पुढील तपास तोफखाना पोलिस करीत आहेत.

पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशावरुन व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपींचा शोध घेतला. सपोनि गणेश वारुळे, हेमंत थोरात, उपनिरीक्षक तुषार धाकराव, सोपान गोरे, सफौ भाऊसाहेब काळे, पोना रवींद्र कर्डिले, संतोष खैरे, ज्ञानेश्वर शिंदे, संतोष लोंढे, भीमराव खर्से, बाळू खेडकर, अमृत आढाव, किशोर शिरसाठ, चंद्रकांत कुसळकर, अरुण मोरे, राजेंद्र वाघ, संजय खंडागळे, बाळासाहेब मुळीक, सुनील चव्हाण, दत्तात्रय हिंगडे, अतुल लोटके, संदीप पवार, बापूसाहेब फोलाणे, विजय वेठेकर, विश्‍वास बेरड, देवेंद्र शेलार, विशाल दळवी, संदीप दरंदले, फुरकान शेख, विशाल गवांदे, रोहित येमूल, रवींद्र घुगांसे, सागर ससाणे, प्रशांत राठोड, अर्जुन बडे यांच्या पथकाने आरोपींना जेरबंद केले.