नाटय़रंग – मैदान फतेह

>>शिल्पा सुर्वे

या प्रत्येकीसाठी शिवप्रताप म्हणजे फक्त नाटक नाही, तर ‘स्वयंसिद्ध’ करण्याची संधी आहे. या टप्प्यावर पोहोचेपर्यंत बऱयाच अडचणी आल्या. मार्गही सापडले. अनेकदा घडले, काही वेळा बिघडले. चिंतेने मन काहूर झाले, तर कधी प्रेक्षकांच्या डोळय़ांत कौतुकाची चमक दिसली. प्रसंग कुठलाही असो प्रत्येक जण स्वकार्य ओळखून आपापली भूमिका चोख बजावत आहेत. मैदान फतेह करत आहेत…रणतांडव विजयी करत आहे.

दिवस रोज सुरू होतो, रोज संपतो. दिनचक्र सुरू असते. पण एक दिवस असा येतो, जो तुमचा असतो. त्या दिवशी तुम्ही तुमच्या नकळत स्वतला ‘ब्राव्हो’ म्हणता. ‘त्या’ 45 जणी असाच काहीसा अनुभव घेत आहेत. परळच्या नीलिमा खोत जेवणाची ऑर्डर घेण्याचे काम करतात. हाताला उत्तम चव. आज नीलिमा यांना अभिनयामुळे ओळख मिळालेय. ‘शिवप्रताप’ या ऐतिहासिक नाटकात त्या छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारतात. लालबागच्या दिया पराडकर या साध्या गृहिणी, घरसंसार, मुलगी याच्या पलीकडे कधी न गेलेल्या. दिया आज रंगमंचावर आत्मविश्वासाने उभ्या राहू शकतात. अफझलखानाची आव्हानात्मक भूमिका त्या लीलया करतात. अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या, सामान्य घरातल्या तब्बल 45 जणी एकत्र येऊन ‘शिवप्रताप’ हे दोन अंकी व्यावसायिक नाटक सादर करतात. या नाटकाचे दहा प्रयोग यशस्वी झाले आहेत. यात छत्रपती शिवाजी महाराज, अफझलखान, जिवा महाले, कान्होजी जेधे, गोपीनाथ पंत, मुसे खान, कृष्णाजी भास्कर, तानाजी मालुसरे, विसाजी, बडी बेगम, मुसे खान, फाझलखान अशा साऱया भूमिका या 45 जणी करतात. पहिल्यांदाच असा वेगळय़ा धाटणीचा प्रयोग होत आहे. सब कुछ महिला!

खरं तर या सगळय़ा परळच्या स्वयंसिद्धा महिला मंडळाच्या सदस्या आहेत. मंडळासाठी मंगळागौर कार्यक्रम, नाटिका, काव्यवाचन, पत्रलेखन स्पर्धा असे उपक्रम मंडळामार्फत सातत्याने होत असतात. पण व्यावसायिक रंगभूमीवर एखादे नाटक घेऊन जाऊ असा विचार त्यांनी कधी केला नव्हता. स्वप्नांना बळ देणारा हाच तो दिवस होता. स्वयंसिद्धा मंडळाच्या संस्थापिका आणि ‘शिवप्रताप’ची संकल्पना, दिग्दर्शक आणि निर्मिती अशी बहुरंगी कामगिरी निभावणाऱया श्रुती परब म्हणतात, दरवर्षी मंडळातर्फे आम्ही शिवजयंतीला म्हणजे 19 फेब्रुवारी रोजी शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यासाठी पोवाडा सादर करतो. गेल्यावर्षी आमचं ठरलं की, महाराजांचे दोन अंकी नाटक सादर करू या. मी अफझलखानाचा वध यावर नाटक लिहिले आणि बसवले. नाटक सगळय़ांना आवडले. तुम्ही हे व्यावसायिक नाटक का करत नाही, अशी विचारणा स्मितहरी प्रोडक्शनचे हरी पाटणकर यांनी केली. आम्हालाही स्वतला आजमावून पाहावेसे वाटू लागले. व्यावसायिक रंगभूमीवर उतरायचे तर पूर्ण तयारीनिशी उतरावे लागणार होते, याची जाणीव सगळय़ा जणींना होती. मनाची तयारी झाली. तालमीसाठी दामोदर नाटय़गृहाचा हॉल भाडय़ाने घेण्यात आला.

रंगमंचाला आपलेसे कसे करायचे. लाईटस कशा घ्यायच्या, म्युझिक कसे एन्जॉय करायचे… सगळेच शिकायचे होते. महिलांना लाठीकाठी, तलवारबाजी यांचे प्रशिक्षण परळच्या लाल मैदानात देण्यात आले. सहा महिने तालमी झाल्या. घरातली कामे करता करता महिलांनी संवाद पाठ केले.

‘शिवप्रताप’चा पहिला व्यावसायिक प्रयोग 18 मार्च 2023 रोजी झाला. सुरुवात तर झाली. अडचणी होत्या, पण तरी कुणीही कच खाल्ली नाही. सुरुवातीचे काही प्रयोग संयमाची परीक्षा पाहणारे होते. ‘शिवप्रताप’चे दहा प्रयोग झाले आहेत. आज या महिलांना सांगताना अभिमान वाटतोय की, नाटकाचा प्रत्येक प्रयोग हाऊसफुल्ल आणि पूर्णपणे तिकीट विक्रीवर यशस्वी सुरू आहे.

या 45 रणरागिणीची मोट बांधलेय श्रुती परब यांनी. त्या स्वत ‘शिवप्रताप’मध्ये गोपीनाथपंत देशकुलकर्णी आणि खानाला विडा देणाऱया बडी बेगम अशा दोन भूमिका करत आहेत. त्या सांगतात, प्रत्येक दिवस नवा अनुभव देणारा असतो. दामोदर नाटय़गृहात आमचा दुसरा प्रयोग होता तेव्हाची आठवण विसरता येणार नाही. सततच्या धावपळीमुळे मी 15 दिवस नीट झोपले नव्हते. परिणामी तालमीच्या वेळी स्टेजवर कोसळले. मला शुद्ध नव्हती. लगेच हॉस्पिटलमध्ये आयसीयूमध्ये हलवण्यात आले. डॉक्टर म्हणाले चार दिवस डिस्चार्ज मिळणार नाही. तालमीचे काय होणार? तिसऱया दिवसावर प्रयोग होता. नाटकाच्या अख्ख्या टीमने हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. मी डॉक्टरांना माझ्यापरीने समजवण्याचा प्रयत्न केला. माझी इच्छाशक्ती दांडगी होती. परमेश्वर कृपेने मला डिस्चार्ज मिळाला. मी थेट तालमीच्या ठिकाणी पोहोचले. प्रयोग चांगला झाला. तेव्हापासून आम्ही थांबलो नाही. लवकरच ‘शिवप्रताप’चा मालवण दौरा आहे. या प्रत्येकीसाठी शिवप्रताप म्हणजे फक्त नाटक नाही, तर ‘स्वयंसिद्ध’ करण्याची संधी आहे. या टप्प्यावर पोहोचेपर्यंत बऱयाच अडचणी आल्या. प्रसंग कुठलाही असो प्रत्येक जण स्वकार्य ओळखून आपापली भूमिका चोख बजावत आहेत. मैदान फतेह करत आहेत…