गुजरातमधून आदेश आल्यानंतर ठाण्यात मिंध्यांची उमेदवारी जाहीर होईल; आदित्य ठाकरे यांचे तडाखे

ठाणे लोकसभेची उमेदवारी ही भाजपला मिळणार की मिंधेंना हे गुजरातमधून आदेश आल्यानंतरच कळेल, असे जोरदार तडाखे शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मिंध्यांना लगावले. ही लढाई बाप चोरणाऱ्या, पक्ष चोरणाऱ्या, संविधान बदलणाऱ्या तसेच महाराष्ट्राला दिल्लीत झुकवणाऱ्यांच्या विरोधात असल्याचे टीकास्त्रही त्यांनी सोडले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार राजन विचारे यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करत आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. महायुतीचा उमेदवार कोण? ही जागा भाजप घेणार की मिंधेंना देणार यात महायुतीमध्ये गोंधळ सुरू असतानाच शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांनी वाजतगाजत, गुलाल उधळत ढोलताशांच्या गजरात प्रचंड गर्दीत आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला.

या रॅलीत आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड, शिवसेना सचिव वरुण सरदेसाई, उपनेत्या ज्योती ठाकरे, उपनेते विजय कदम, रायगड जिल्हा सहसंपर्कप्रमुख आणि कोकण पदवीधर मतदार संघ यंत्रणाप्रमुख किशोर जैन, काँग्रेस नेते मुजफ्फर हुसेन, प्रदेश सरचिटणीस मनोज शिंदे, जिल्हाप्रमुख केदार दिघे, विठ्ठल मोरे, द्वारकानाथ भोईर, प्रभाकर म्हात्रे, काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष अॅड. मनोज आखरे, नवी मुंबई काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक, काँग्रेस शक्तिप्रदर्शन नव्हे, हे तर शिवसेनेवरील प्रेम विचारे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठ्या प्रमाणात भरउन्हात कार्यकर्त्यांची गर्दी झाल्याने हे शक्तिप्रदर्शन नव्हे तर शिवसेनेवरील प्रेम आहे. शिवसेना आणि ठाण्याचे जुने नाते आहे. आम्ही जनतेचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचवणारच, असे आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

राजन विचारे हॅट्ट्रिक करणारच
राजन विचारे यांनी आपल्या प्रचारात बाजी मारली आहे. राज्यात ठाणे लोकसभेला महत्त्व असल्याने महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विचारेंच्या मागे ठामपणे उभे राहण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे या निवडणुकीतही मोठ्या मताधिक्क्याने विजयी होऊन ते यंदा हॅट्ट्रिक करणारच, असा विश्वास जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला.