लोकशाहीवरील येणारे संकट थोपवण्याचे सामर्थ्य शिक्षकांमध्ये; सुभाष देसाई यांचा विश्वास

वैयक्तिक स्वातंत्र्य आणि मूलभूत हक्कांची सध्या होत असलेली गळचेपी पाहता सध्याचे शासनकर्ते देशाला हुकूमशाहीकडे नेत आहेत. त्यामुळे देशातील लोकशाही टिकविण्यासाठी आणि देशाचे संविधान बदलविण्याचा प्रयत्न हाणून पाडला पाहिजे. हे सामर्थ्य शिक्षकांमध्ये नक्कीच आहे. यासाठी शिक्षकांनी पालकांमध्ये, संपर्कातील जुन्या विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करावी आणि अनिल देसाई यांच्यासारख्या बुद्धिवादी, लोकशाहीप्रेमी उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी आज केले.

शिवसेना भवन येथे आज शिक्षक सेनेचा मेळावा मोठय़ा उत्साहात संपन्न झाला. दक्षिण-मध्य मुंबई महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल देसाई यांच्या प्रचारार्थ शिक्षकांनी योगदान द्यावे असे आवाहन यावेळी सुभाष देसाई यांनी केले. केंद्र सरकारकडून सुरू असलेल्या दडपशाहीचा तपशीलच त्यांनी यावेळी शिक्षकांसमोर मांडला. यावेळी मेळाव्याचे अध्यक्ष ज. मो. अभ्यंकर यांनी संविधान वाचवण्यासाठी शिवसेनेचे उमेदवार अनिल देसाई यांच्या प्रचारकार्यात शिक्षकांनी हिरिरीने सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. या मेळाव्याला शिक्षक सेनेचे कार्याध्यक्ष जालिंदर सरोदे, सरचिटणीस प्रकाश शेळके, राज्य समन्वयक नितीन चौधरी, राज्य उपाध्यक्ष सलीम शेख, राज्य उपाध्यक्ष सिमसन कोचान, राज्य कोषाध्यक्ष सुधाकर कापरे, कायदेशीर प्रमुख सल्लागार मच्छिंद्र खरात, प्रादेशिक सचिव मुकेश शिरसाठ, मुंबई विभाग अध्यक्ष अजित चव्हाण, सरचिटणीस मुरलीधर मोरे, कोकण विभाग अध्यक्ष जगदीश भगत, ज्युनियर कॉलेज राज्य अध्यक्ष आर. बी. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.