शिवसेना करणार निवडणूक आयोगाविरोधात खटला

व्हीप आमचाच… व्हीप म्हणजे चाबूक… तो लाचारांच्या  नव्हे तर शिवसैनिकांच्या हाती शोभतोः उद्धव ठाकरे

ही लढाई आता केवळ लोकशाहीची राहिलेली नाही. सुप्रीम कोर्टाच्याही अस्तित्वाची ही लढाई बनली आहे. देशात सुप्रीम कोर्ट अस्तित्वात राहणार की लवाद त्यांच्या डोक्यावर बसणार त्याचा फैसला करणारी ही लढाई आहे. सुप्रीम कोर्टाचा आदेश सर्वेच्च मानायचा की या लबाडाचा आदेश सर्वेच्च मानायचा ही लढाई यापुढे होणार आहे.

शिवसैनिकांनी 19 लाख 41 हजार प्रतिज्ञापत्रे निवडणूक आयोगाला सादर केली. त्यासाठी सामान्य शिवसैनिकांच्या पदरचे पैसे गेले आहेत. हे पैसे आयोग देणार आहे का, असा सवाल करतानाच आयोगाने प्रतिज्ञापत्रे घेण्याचा फार्स करून मोठा घोटाळा केला आहे. आयोगावर खटलाच भरला पाहिजे, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हल्ला चढवला. विधानसभा अध्यक्षांच्या निकालावरून उद्धव ठाकरे यांनी भीती व्यक्त केली. देशात सुप्रीम कोर्ट राहणार की लवाद त्यांच्या डोक्यावर बसणार याचा फैसला करणारी लढाई सुरू झाली आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. व्हीपला मराठीत चाबूक म्हणतात आणि चाबूक लाचारांच्या नव्हे शिवसैनिकांच्याच हाती शोभतो, असे उद्धव ठाकरे गरजले.

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण या निवडणूक चिन्हाबाबत एकतर्फी निकाल देणाऱ्या निवडणूक आयोगाला उद्धव ठाकरे यांनी फैलावर घेतले. निवडणूक आयोगावर केसच केली पाहिजे. कारण त्यांनी आम्हाला कामाला लावले होते. जवळपास 19 लाख 41 हजार शपथपत्रे आणि 100 रुपयांच्या स्टँप पेपरवरती प्रतिज्ञापत्रे आम्ही सादर केली. त्याचे काय झाले? निवडणूक आयोग काय गाद्या करून त्यावर झोपला का? एकतर ती प्रतिज्ञापत्रे स्वीकारा नाहीतर 19 लाख 41 हजार इंटू किती असतील तेवढे पैसे आम्हाला द्या, असे उद्धव ठाकरे यांनी सुनावले. हा निवडणूक आयोगाचा मोठा घोटाळा आहे. पैसे सामान्य शिवसैनिकांचे गेले आहेत. इकडे कुणी जगातले दोन नंबरचे श्रीमंत आमचे मित्र नाहीत की ते पैसे देतील आणि आम्ही अर्ज भरून घेऊ, असा टोला उद्धव ठाकरे यांनी हाणला. ईडीसुद्धा त्यांचीच नोकर आहे. सगळेच नोकर आहेत त्यांचे. हे मी उघडपणाने बोलतो आहे. ते काय करणार? तुम्ही बसलात ना इकडे. बघून घ्याल तुम्ही. मला काय चिंता, असे उद्धव ठाकरे म्हणाले तेव्हा टाळ्यांचा कडकडाट झाला.

हिंमत असेल तर पोलीस संरक्षण बाजूला ठेवून माझ्यासोबत जनतेत या आणि सांगा, शिवसेना कुणाची, मग कुणाला पुरावा, गाढावा आणि तुडवावा हे जनताच ठरवेल, असे खुले आव्हान या वेळी उद्धव ठाकरे यांनी नार्वेकर आणि मिंध्यांना दिले.

उद्धव ठाकरे या वेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अक्षरशः तुटून पडले. मागच्या आठवडय़ात लबाडाने जो निकाल दिला, नव्हे लवादाने जो निकाल दिला त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोत. सर्वोच्च न्यायालयाकडून आशा आहेतच, पण आज लोकशाहीचा मूलभूत घटक असलेल्या जनतेच्या न्यायालयात आम्ही आलो आहोत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

देशातला मतदार हा सरकार ठरवत असतो आणि सरकार कुणाचेही असले तरी सत्ता जनतेचीच असली पाहिजे, असे सांगतानाच, आज सर्वकाही समोर ठेवून अपात्रतेची सुनावणी जनतेच्या दरबारात ठेवत आहोत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

मिंध्यांना आव्हान देतो, अध्यक्षांविरुद्ध अविश्वास ठराव आणा

सर्वोच्च न्यायालयाने अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे लवाद म्हणून दिला होता. त्या लवादाने शिवसेनेच्या आमदारांना अपात्र का ठरवले नाही म्हणून मिंधे आता हायकोर्टात गेले आहेत. मी आव्हान देतो, राज्यपालांना विनंती करतो की त्या वेळी विशेष अधिवेशन बोलवले तसेच आताही बोलवा, अध्यक्षांविरुद्ध अविश्वास ठराव आणा, आम्ही पाठिंबा देतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

राहुल नार्वेकर गारद्यांच्या गर्दीत सापडलेत

उद्धव ठाकरे यांनी या वेळी – ‘गर्तेत गारद्यांच्या सामील रामशास्त्री, मेल्याविना मढय़ाला दुसरा उपाव नाही’ अशा सुरेश भट यांच्या कवितेतील ओळी ऐकवल्या. राहुल नार्वेकर हेसुद्धा गारद्यांच्या गर्दीत सामील झाले असून त्यांचा निकालही या कवितेतील ओळींप्रमाणे आहे अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

ही लढाई केवळ शिवसेनेची नाही

ही लढाई फक्त शिवसेनेची नाही. ही लढाई देशात लोकशाही जिवंत राहणार की नाही त्याची आहे. देशात सुप्रीम कोर्टाचे अस्तित्व राहणार की नाही की लवाद त्याच्या डोक्यावर बसणार त्याची ही लढाई आहे, असे उद्धव ठाकरे यांनी उपस्थित जनतेला सांगितले.

माझे पद अवैध होते तर मोदींनी पाठिंबा द्यायला का बोलवले?

शिवसेनेने सर्व कागदपत्रे निवडणूक आयोगाला योग्य वेळी सादर केली आहेत, आणखी काही हवे असेल तर तेसुद्धा काढून देतो, असे सांगतानाच, 1999मधील शिवसेनेची घटना नार्वेकरांनी अंतिम मानली असेल तर 2014मध्ये नरेंद्र मोदींनी त्यांना पाठिंबा द्यायला मला का बोलवले होते? माझी सही कशासाठी घेतली? कुठल्या तरी शेवफाफडावाला, ढोकळेवाल्याची सही घ्यायची होती, असे टीकास्त्र उद्धव ठाकरे यांनी सोडले. 2019मध्येही जी रांग बसली होती त्यात मीसुद्धा होतो. आता बाळासाहेब नसल्याने आपण चर्चाविमर्श करण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्याशी बोलतो, असे मोदी त्या वेळी म्हणाले होते, याचीही आठवण उद्धव ठाकरे यांनी करून दिली.

शहा, फडणवीसांवरही हल्लाबोल

उद्धव ठाकरे यांनी या वेळी केंद्रीय गृह मंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. माझे पद अवैध होते तर 2019मध्ये भाजपाचे तत्कालीन महनीय अध्यक्ष अमित शहा मातोश्रीवर का आले होते? देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षे मुख्यमंत्री पद उबवले ते कुणाच्या पाठिंब्याने, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

अध्यक्षांविरुद्ध अविश्वास ठराव आणा

शिवसेना सर्वोच्च न्यायालयात गेली आणि मिंधे गट आता हायकोर्टात गेला आहे. त्यांनाही न्याय मिळालेला नाही असे वाटत असेल तर राज्यपालांना विनंती आहे की त्यांनी विशेष अधिवेशन बोलवावे आणि मिंध्यांनी विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव आणावा, शिवसेना पाठिंबा देईल, हाकला त्यांना, असेही आव्हान उद्धव ठाकरे यांनी या वेळी दिले.

नड्डा बोलल्यापासून कटकारस्थानाला सुरुवात झाली

या देशात फक्त एकच पक्ष शिल्लक राहणार आणि तो म्हणजे भाजप, असे भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा 2022मध्ये म्हणाले होते. तेव्हापासून सरकार पाडण्याच्या या कटकारस्थानाला सुरुवात झाली, असा घणाघात या वेळी उद्धव ठाकरे यांनी केला. ते पुढे म्हणाले की, भाजपाने ईडी, सीबीआय, आयकर खाते असे सर्वांनाच या कटात घेतले आणि घाव घालायला सुरुवात केली. शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली. सर्व पक्ष संपवणार असे जर भाजपाचा अध्यक्ष बोलत असेल तर निवडणूक आयोगाला हे मान्य आहे काय? खेचा त्यांची शेंडी. शेंडी बोलतो. नाड्डा बोललो तर चुकीचा अर्थ घेऊ नका, असा मिश्किल चिमटाही उद्धव ठाकरे यांनी काढला.

जल्लादाचे काम लवादाला दिले होते

राहुल नार्वेकर यांच्या लवादाला जल्लादाचे काम दिले होते पण त्यांनी दुसरेच काम केले, अशी खिल्लीही उद्धव ठाकरे यांनी या वेळी उडवली. ते म्हणाले की, कोर्ट फाशीची शिक्षा सुनावते पण प्रत्यक्ष अमलात आणतो जल्लाद. त्या जल्लादाचे काम नार्वेकरांच्या लवादाला दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने तयारी करून दिली, पण लवाद म्हणतो, यांना फाशी कशी देऊ? यांच्या जन्माचा दाखलाच नाही. पण न्यायालयाने जन्माचा दाखला तपासायला नाही तर जो गुन्हा केलाय त्याबद्दल त्याला फाशी द्यायला सांगितली होती, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

गद्दार… गद्दार, वन्स मोअर…

शिवसेनेच्या 2018मधील राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीचा व्हिडीओ या वेळी दाखवण्यात आला. त्या वेळी एकनाथ शिंदे यांची नेते पदी निवड झाली तेव्हा त्यांनी उद्धव ठाकरे यांना वाकून नमस्कार केला होता. ते पाहून उपस्थितांमधून गद्दार, गद्दार, गद्दार अशा जोरदार घोषणा घुमल्या. इतकेच नव्हे तर त्या व्हिडीओला वन्स मोअरही दिले. नालायकांची फौज घेऊन शिवसेनेला गिळायला निघालात, आज कदाचित वाटेल गिळले म्हणून, पण चोवीस तासांत बघाल काय होईल ते, असा गंभीर इशाराही उद्धव ठाकरे यांनी या वेळी दिला.

ही माती गद्दारांना तिथल्या तिथे गाडते

महाराष्ट्र ही रामशास्त्री प्रभुणे आणि देशाची घटना लिहिणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमी आहे. त्या महाराष्ट्रापासून यांनी लोकशाहीच्या खुनाला सुरुवात केली आहे. याच मातीत तुम्हाला ही अवदसा सुचली? जिथे रामशात्री, डॉ. आंबेडकर ही रत्ने घडली तिथे लोकशाहीचे हत्यारे जन्म घेत आहेत आणि त्यांना त्यांची महाशक्ती साथ देत आहे. महाराष्ट्राच्या मातीचा पराक्रम त्यांना माहीत नाही. ही माती गद्दारांना थारा देत नाही. तिथल्या तिथे गद्दारांना गाडून टाकते. संपवून टाकते, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.

हा सूर्य आणि हा जयद्रथ, आता तरी न्याय मिळावा

लवादाने जो निकाल दिला त्याविरोधात शिवसेना सर्वोच्च न्यायालयात गेली असल्याचे उद्धव ठाकरे यांनी या वेळी सांगितले. निकाल किती खरा आणि किती खोटा हे पुराव्यानिशी जनतेसमोर मांडले आहे, हा सूर्य आणि हा जयद्रथ केले आहे, आता तरी न्याय मिळावा, अशी आशा उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

सर्वोच्च न्यायालयाबद्दल आमच्या मनामध्ये आदर आहे, विश्वास आहे मात्र त्याचबरोबरीने आजपासून ही खटल्याची सुनावणी मी तुम्हा सर्वांच्या साक्षीने माझ्या महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या दरबारात नेत आहे.

पुरावा पुरावा पुरावा की गाडावा… माझं तर आव्हान आहे नार्वेकरांनी, मिंध्यांनी माझ्याबरोबर जनतेत जाऊन उभं राहावं. पोलीस प्रोटेक्शन नाही. मी एकसुद्धा पोलीस सोबत घेणार नाही आणि तसंच मिध्यांनी यावं, नार्वेकरांनी यावं आणि तिथे नार्वेकरांनी सांगावं शिवसेना कुणाची, आणि मग जनतेने ठरवावं कोणाला पुरावा, गाडावा का कुणाला तुडवावा. माझी तयारी आहे. माझ्यात हिंमत आहे.

कोर्ट फाशीची शिक्षा सुनावतं पण प्रत्यक्षात अमलात आणतो जल्लाद. त्या जल्लादाचं काम या लवादाला दिलं होतं. सुप्रीम कोर्टाने फाशीसाठी सगळं काही तयार करून दिलं आणि लवाद म्हणतं फाशी कशी देऊ यांच्या जन्माचा दाखलाच नाही. अरे जन्माचा दाखला तपासायला तुला सांगितले नाही. त्याने जो गुन्हा केला त्याच्याबद्दल फाशी द्यायला तुला सांगितले होते.

शिवसेना विकता येणार नाही हे लक्षात ठेवा. शिवसेना ही आमचीच आहे. व्हीपही आमचाच असणार. व्हीपचा मराठी अर्थ चाबूक आहे. चाबूक लाचारांचा नव्हे तर शिवसेनाप्रमुखांचा आणि त्यांच्या शिवसैनिकांचाच चालणार.