देशात सभ्यता, संस्कृतीचे हनन; उल्हासनगर गोळीबार प्रकरणावरून शिवसेना कडाडली

देशात सभ्यता, संस्कृती टिकून असून सौहार्दपूर्ण संवाद होत असल्याचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या अभिभाषणात सांगितले, परंतु सर्वांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे शिवसेनेने नमुद केले. कारण, महाराष्ट्रातील उल्हानसगरात पोलीस ठाण्यातच एका आमदाराने सत्ताधारी युतीतील पदाधिकाऱयाला गोळ्या घातल्या. यावरून देशात संस्कृती आणि सभ्यतेचे हनन होतेय हेच दिसत आहे. त्याचबरोबर मणिपूरमध्ये जे घडले ते देशाला कलंकीत करणारे आहे, आजही मणिपूर शांत नाही, याबाबत राष्ट्रपतींनी कुठेही उल्लेख केला नाही, अशा शब्दात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार अरविंद सावंत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान लोकसभेत कडाडले.

मणिपूर धुमसतेय, पण राष्ट्रपतींच्या अभिभाषणात त्याचा उल्लेख नव्हता, असे सांगतानाच या देशात ज्यांच्यावर आरोप आहेत तेच निवडून येत आहेत, ही स्थिती आहे, याकडेही अरविंद सावंत यांनी लक्ष वेधले. टु-जी, थ्री-जी स्पॅमबद्दल बोलले जाते परंतु, गेल्या 10 वर्षांत भारत संचार निगम लिमिटेड आणि टेलिपह्न महानगर निगमसाठी सरकारने काय केले, असा सवालही अरविंद सावंत यांनी यावेळी केला.

राम मंदिरासाठी ज्या कारसेवकांनी प्राणांची आहुती दिली त्यांची आठवण ठेवा असे आवाहन अरविंद सावंत यांनी केले. आमच्यासाठी रामलल्ला प्यार आहे, काही जणांसाठी व्यापार आहे, आमच्यासाठी राम नीती आहे, काही जणांसाठी राजनीती आहे, अशा शब्दांत सावंत यांनी भाजप आणि मोदी सरकारवर तोफ डागली.