सीमेवर होणार ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची ख्याती केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर सर्वदूर पसरलेली आहे. या बाप्पाच्या दर्शनासाठी देशाच्या कानाकोपऱयातून भाविक पुण्यात येतात. मात्र आपले सैनिक सीमेवर अहोरात्र पहारा देत असल्याने त्यांना पुण्यात येता येतेच असे नाही. त्यामुळे यंदा हिंदुस्थानी लष्करातील 33, 19, 1, 5 आणि 6 मराठा बटालियनच्या सैनिकांनी अरुणाचल प्रदेश आणि पंजाबसह देशाच्या विविध सीमावर्ती भागात दगडूशेठच्या श्रींची प्रतीकात्मक मूर्ती स्थापन करण्याची इच्छा व्यक्त केली. सैनिकांच्या इच्छेला मान देऊन ट्रस्टने श्रींची हुबेहूब प्रतिकात्मक मूर्ती देण्याचे मान्य केले. त्यानुसार नुकत्याच या मूर्ती अरुणाचल प्रदेश, पंजाबसह विविध ठिकाणी रवाना झाल्या आहेत. सीमेवरील लष्करी ठाण्यात गणेशाची मूर्ती स्थापन केल्याने मराठा बटालियनच्या सैनिकांना वेगळी ऊर्जा मिळते. तसेच या ठिकाणी देशातील सर्व राज्यांतील सैनिक कार्यरत असतात. त्यामुळे बाप्पाचा आशीर्वाद सर्व सैनिकांना मिळेल, अशी भावनादेखील मराठा बटालियनच्या सैनिकांनी व्यक्त केली आहे.