फतव्याबाबत पुरावे दिल्यास पाच लाखांचे बक्षीस देणार! सोलापुरातील भाजप उमेदवार राम सातपुते यांना मुस्लिम तरुणाचे आव्हान

solapur-lok-sabha-constituency

सोलापूर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी मुस्लिम समाजावर टीका करीत मशिदीतून फतवा काढण्यात येत असल्याचा आरोप केला होता. याबाबत पुरावे सादर केल्यास त्यांना पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहेत. याप्रकरणी राम सातपुतेंविरुद्ध जिल्हा निवडणूक अधिकाऱयांकडे दोन तक्रारी देण्यात आल्या आहेत. या तक्रारींमुळे भाजपचे राम सातपुते आगपाखड करीत असल्याचे चित्र आहे.

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे व भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्यातील प्रचार टिपेला पोहोचला आहे. प्रणिती शिंदे यांचे पारडे जड होत असल्याने भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी मशिदीमधून महाविकास आघाडीचा प्रचार होत असल्याचे विधान करीत, ‘मशिदीमधील मौलवी हे मोदींना पाडण्यासाठी काँग्रेसला मतदान करा, असे फतवे काढत आहेत,’ असा आरोप केला आहे.

या वक्तव्याने संतप्त झालेल्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दिली असून, याची गंभीर दखल घेण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाजातील सईद नाईकवाडी या तरुणाने राम सातपुते यांना खुले आव्हान दिले असून, ‘सातपुते यांनी फतव्याबाबत पुरावे दाखविल्यास पाच लाख रुपयांचे बक्षीस देऊ,’ असे आव्हान दिले आहे. मशिदीमध्ये प्रार्थनेशिवाय दुसरी कसलीही चर्चा होत नाही, असा दावा त्याने केला आहे. पुराव्यासाठी पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर झाल्यापासून भाजपमध्ये अस्वस्थता पसरली आहे.