
शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे दक्षिण मुंबईतील रेल्वे स्थानकांवर अतिरिक्त सरकते जिने आणि लिफ्ट्स उभारण्यात येणार आहेत. परळ, भायखळा आणि चिंचपोकळी या स्थानकांवर एपूण 6 सरकते जिने आणि 6 लिफ्ट्स उपलब्ध होणार आहेत. शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत यांनी यासंदर्भात मध्य रेल्वे प्रशासनाकडे वेळोवेळी पत्रव्यवहार केला होता. या प्रयत्नांना यश आल्यामुळे ज्येष्ठ नागरिक, रुग्णांसह हजारो प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे.
मध्य रेल्वे मार्गावरील अनेक स्थानकांच्या नियमित प्रवाशी संख्येत वाढ झाली आहे. वाढती प्रवाशी संख्या तसेच ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि रुग्णांची गैरसोय दूर करण्याच्या दृष्टीने सुविधांचा विस्तार करण्याबाबत खासदार अरविंद सावंत यांनी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना पत्र लिहिले होते. पत्रात अतिरिक्त सरकते जिने आणि लिफ्ट्स बसवण्याची मागणी केली होती. त्यांच्या पत्राची गंभीर दखल घेत मध्य रेल्वे प्रशासनाने ‘अमृत भारत स्थानक योजने’ अंतर्गत परळमध्ये 2 सरकते जिने व लिफ्ट्स, चिंचपोकळी स्थानकात 1 सरकता जिना व लिफ्ट तसेच भायखळा स्थानकात 3 सरकते जिने व लिफ्ट्सची उभारणी करण्याची तयारी दाखवली आहे. त्यामुळे हजारो प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे.
प्रस्तावित कामे तातडीने पूर्ण करा; अरविंद सावंत यांची सूचना
रेल्वे स्थानकांतील पादचारी पुलांच्या उंच पायऱया चढताना ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि रुग्णांना मोठा त्रास होतो. परळ परिसरात अनेक प्रमुख रुग्णालये असल्याने मोठय़ा प्रमाणावर रुग्ण व त्यांच्या कुटुंबियांची ये-जा सुरू असते. त्या सर्व नागरिकांचा प्रवास सुकर करण्यासाठी परळ, भायखळा आणि चिंचपोकळी येथील नियोजित सरकते जिने आणि लिफ्ट्सची कामे तत्काळ व विहित कालमर्यादेत पूर्ण करावीत, अशी सूचना खासदार अरविंद सावंत यांनी मध्य रेल्वे प्रशासनाला केली आहे.



























































