नाना शंकरशेट यांच्या स्मारकाबाबत राज्य सरकार उदासीन

मुंबईच्या विकासात नाना शंकरशेट यांनी स्वतःच्या जमिनी दिल्या, संपूर्ण आयुष्य दिले, पण त्यांच्या स्मारकासाठी सतत मागणी करूनही निधी दिला जात नाही. मुंबई सेंट्रल स्टेशनला नाना शंकरशेट यांचे नाव देण्याचा पॅबिनेटचा प्रस्ताव पेंद्राकडे गेला आहे, पण त्यावरही कार्यवाही झालेली नाही. मुंबईच्या आद्य नागरिकांसाठी मोठी शोकांतिका आहे, अशी खंत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार सुनील प्रभू यांनी आज विधानसभेत व्यक्त केली.

विधानसभेत नगरविकास विभागावरील पुरवणी मागण्यांवरील चर्चेत भाग घेताना सुनील प्रभू यांनी नाना शंकरशेट यांच्या स्मारकाकडे व मुंबई सेंट्रल स्टेशनला नाव देण्याबाबतची सरकारची उदासीनता, मालाड पश्चिम येथे रुग्णालय उभारण्याबाबत सतत पाठपुरावा करूनही बजेटमध्ये तरतूद केलेली नाही याकडेही लक्ष वेधले. पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी दूर करण्यासाठी गोरेगावमुलुंड लिंक रोड ते लोखंडवाला येथील डीपी रोड वाहतुकीसाठी खुला करण्याची सूचना त्यांनी केली. झोपडपट्टी व डोंगराळ वस्त्यांमधील दरडी कोसळून वित्तहानी व मनुष्यहानी रोखण्यासाठी संरक्षण भिंतींसाठी निधी देण्याची आणि मालाड आप्पा पाडा भागात फायर इंजिन कायमस्वरूपी तैनात करण्याची मागणी केली.

फाईलवरचा नागोबा कोण? 

निधी वाटपात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदारांना एक छदामही दिला नाही. या फाईलवर कोणता नागोबा बसला आहे? निधी दाबण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही हार मानणार नाही. आम्हीच निवडून येऊ, असा विश्वास यावेळी सुनील प्रभू यांनी व्यक्त केला.