महागाई, बेरोजगारीचे काय ते बोला मगच गावात या! परभणीत मोदी सरकारच्या संकल्प यात्रेच्या रथाची मोडतोड

महागाई, बेरोजगारीचे काय ते बोला आणि मगच गावात पाऊल ठेवा. गावात वीज नाही, पाण्याची सोय नाही. दुष्काळाने गाव होरपळला आहे आणि तुम्ही मोदींचे हसरे फोटो आम्हाला कशाला दाखवता? अशी प्रश्नांची सरबत्ती करत परळगव्हाण येथे तरुणांनी मोदी सरकारच्या विकसित भारत संकल्प यात्रेच्या रथाची मोडतोड केली. तरुणांचा रोष पाहून लटपटलेले अधिकारी पुढील गावात न जाता मोडका रथ घेऊन माघारी परतले.

केंद्र सरकारने राबवलेल्या विकास योजनांची माहिती देण्यासाठी देशभरात सगळीकडे विकसित भारत संकल्प यात्रा काढण्यात आली आहे. योजनांची माहिती देणारा रथ गावोगावी नेण्यात येत आहे. मात्र या यात्रेला ठिकठिकाणी तरुणांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. परभणी जिल्ह्यातील परळगव्हाण येथे आज हा रथ पोहोचला. रथासोबत पी.एस. शिंदे, पी. आर. बोरीकर हे अधिकारी होते. रथावर मोदी सरकारची भलामण करणारे पोस्टर पाहून तरुणांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटली. रथ घेऊन आलेल्या अधिकार्‍यांवर तरुणांनी प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. महागाई, बेरोजगारी, शेतमालाला कमी भाव, निकृष्ट रस्ते, अपुरा वीजपुरवठा, सिंचन असुविधेचे काय? ग्रामीण भाग दुष्काळाच्या वणव्यात होरपळत असताना मोदी सरकार प्रचारात गुंग आहे. रथासोबत असलेल्या अधिकार्‍यांनी तरुणांच्या प्रश्नांचे उत्तर देण्याऐवजी त्यांच्यासोबत हुज्जत घातली. त्यामुळे संतापलेल्या तरुणांनी रथाची मोडतोड केली आणि कार्यक्रम उधळून लावला. तरुणांचा रोष पाहून अधिकार्‍यांनी रथ पुढील गावात नेण्याऐवजी जिल्हाधिकारी कार्यालयात माघारी परत आणला.

केंद्र सरकारच्या विकास योजनांची माहिती देणारा रथ अगोदर सायाळा खटिंग येथे गेला. तेथे थोडक्यात कार्यक्रम झाला. त्यानंतर रथ परळगव्हाण येथे पोहोचला. मात्र गावातील तरुणांनी प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. त्याचे पर्यवसान वादात झाले. त्यानंतर रथाची मोडतोड करण्यात आली. वरिष्ठांच्या आदेशानुसार पुढील कारवाई करण्यात येईल असे गटविकास अधिकारी दीपा बापट यांनी सांगितले.