मेंढपाळाच्या वाडय़ावर तरसाचा हल्ला; 55 मेंढय़ांचा मृत्यू

तरससदृश प्राण्याने मेंढपाळाच्या वाडय़ावर हल्ला केला. यामध्ये 55 मेंढय़ा मृत्युमुखी, तर 10 मेंढय़ा अत्यावस्थ आहेत. आ. नीलेश लंके यांनी व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून पीडित मेंढपाळाशी संवाद साधत दिलासा दिला. वन विभागाच्या अधिकाऱयांशी चर्चा करून तत्काळ पंचनामे करण्याची मागणी केली.

शेवगाव तालुक्यातील घेऊरी, दहीगावने या गावांतील धनगर बांधव अशोक बाबूराव क्षीरसागर यांच्या मेंढय़ांच्या वाडय़ावर 25 एप्रिलला मध्यरात्री तरससदृश प्राण्याने हल्ला केला. यामध्ये 55 शेळय़ा मृत्युमुखी पडल्या, तर 10 शेळय़ा अत्यावस्थ आहेत. नीलेश लंके यांचे सहकारी दहीगावने भागात असताना या मेंढपाळावर ओढावलेल्या संकटाची माहिती त्यांना समजली. त्यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देत आमदार नीलेश लंके यांच्याशी व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून संपर्क केला. लंके यांनी पीडित मेंढपाळ बांधवांशी चर्चा करून त्यांना धीर दिला. तिथे उपस्थित वन विभागाच्या अधिकारी तसेच कर्मचाऱयांशीही लंके यांनी चर्चा करून पंचनामे करून तत्काळ अहवाल पाठविण्याच्या सूचना दिल्या.