
येथील सिव्हिल रुग्णालयात नवजात अर्भकाचा मृत्यू झाल्याची घटना आज घडली. शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच आपले बाळ गमवावे लागल्याचा आरोप माता-पित्याने केला असून या प्रकरणी डॉक्टर जिशान अन्सारी याला निलंबित करण्यात आले आहे.
मुलुंडच्या रतनभाई कंपाऊंड येथे सरस्वती इंगळे या राहतात. शनिवार 6 जून रोजी सायंकाळी पाच वाजता त्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये प्रसूतीसाठी दाखल झाल्या. तेथे त्यांनी बाळाला जन्म दिला. औषधोपचार सुरू असतानाच आज सकाळी साडेअकराच्या सुमारास अर्भकाचा मृत्यू झाला. त्यानंतर अविनाश इंगळे यांनी शिकाऊ डॉक्टरची तक्रार त्यांनी आरोग्य विभागाकडे केली. शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांना ही घटना समजताच त्यांनी तातडीने सिव्हिल रुग्णालयात जाऊन संबंधित अधिकाऱयांना जाब विचारला. सर्वसामान्यांच्या जीवाशी सुरू असलेला खेळ थांबला नाही तर शिवसेना स्टाईलने आंदोलन करू, असा इशारा दिला. यावेळी शिवसेना महानगरसंघटक महेश कदम, शाखाप्रमुख सुमीत बारोटे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.
सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; शिवसेनेची मागणी
प्रशासनाने केवळ माफी किंवा शिकाऊ डॉक्टरवर निलंबनाची कारवाई न करता दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेनेने केली.































































