
>> जैतू मुठोळकर
वेळ सकाळी सवादहाची. कल्याणहून मुरबाडला लवकर पोहोचता यावे यासाठी प्रवाशांनी इको टॅक्सी पकडली. कुणाला कॉलेजला जायचे होते तर कुणाला ऑफिस गाठायचे होते. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी कोंबलेली टॅक्सी सुसाट निघाली. कल्याण-मुरबाड मार्गावरील रायते पुलावर अर्ध्या तासात टॅक्सी पोहोचताच चालकाने सिमेंट मिक्सरला जोरदार धडक दिली. काळ जणू दबा धरून बसला होता. ही धडक एवढी भीषण होती की, बचावासाठी प्रवाशांना एक सेकंदही मिळाला नाही. जीवाच्या आकांताने सर्व प्रवासी ओरडले आणि एका क्षणात होत्याचे नव्हते झाले. छिन्नविछिन्न अवस्थेत काही प्रवासी तर टॅक्सीच्या बाहेर फेकले गेले. रायते पुलावर रक्ताचा सडा पडला होता. काळीज पिळवटून टाकणारे दृश्य बघून अनेकांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. कल्याण-मुरबाड मार्गावर वारंवार असे अपघात होत असल्याने हा रस्ता जणू मृत्यूचा मार्ग बनला आहे.
लग्नाला चाललेल्या तीन भावंडांचा दुर्दैवी मृत्यू
मुरबाड तालुक्यातील फ्हे गावात राहणारे मोहपे कुटुंबीय सध्या ठाण्यातील दिवा येथे राहते. या कुटुंबातील स्नेहा मोहपे, मानसी मोहपे आणि प्रथमेश मोहपे ही तीन भावंडे कुटुंबातील लग्नानिमित्त मुरबाडच्या फ्हे गावाकडे निघाली होती. मात्र या भीषण अपघातात या तिन्ही भावंडांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने मोहपे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
कल्याण ते मुरबाड आणि मुरबाड ते कल्याण अशी टॅक्सीची प्रवासी सेवा सुरू असते. मात्र पाचजणांच्या सीटवर पैशांच्या मोहाने टॅक्सीचालक तब्बल 12 ते 15 जणांना कोंबून नेतात. आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास कल्याणहून एक इको टॅक्सी तब्बल बारा प्रवासी कोंबून मुरबाडच्या दिशेने निघाली. कल्याण ग्रामीण भागातील रायते येथील पांजरा पुलाजवळ भरधाव जाणाऱ्या या टॅक्सीला समोरून आलेल्या सिमेंट मिक्सरने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की कारमधील प्रवाशांना सावरण्याचीही संधी मिळाली नाही. अख्ख्या टॅक्सीचा चेंदामेंदा झाला. टॅक्सीतील बारा प्रवाशांपैकी अकरा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला.
देव तारी त्याला कोण मारी
या इको टॅक्सीच्या अपघातात तीनजण गंभीर जखमी झाले. त्यांना उल्हासनगर येथील सेंट्रल रुग्णाल यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांची नावे उशिरापर्यंत समजू शकली नाहीत. एकाच वेळी ११ जणांचे बळी गेले असतानाच तीनजण आश्चर्यकारकरीत्या बचावल्याने ‘देव तारी त्याला कोण मारी’ याच उक्तीचा प्रत्यय आला.
रुग्णालयात नातेवाईकांचा आकांत
अपघातातील सर्वांचे मृतदेह गोवेली आणि मुरबाड रुग्णाल यात आणण्यात आले. अपघाताचे वृत्त कळल्यानंतर मृतांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली. त्यामुळे मोठी गर्दी रुग्णाल यात झाली होती. आपल्या आप्तांचे मृतदेह पाहून त्यांनी अक्षरशः हंबरडा फोडला. हृदय पिळवटून टाकणारा हा आकांत ऐकून मदतीला धावलेले गावकरीही हबकून गेले. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्याचे गोवेली रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपलक्ष्मी मेश्राम यांनी सांगितले.
गावकरी मदतीला धावले
या अपघाताची माहिती मिळताच गावकरी मदतीसाठी धावले. परंतु घटनास्थळावरील भीषण दृश्य पाहून त्यांच्या काळजाचा ठोका चुकला. टॅक्सीचा चक्काचूर होऊन फक्त सांगाडा उरला होता आणि काही प्रवाशांचे मृतदेह रस्त्यावर इतस्ततः पसरले होते.
महसूल अधिकारी घोरपडेंचा प्रवास अखेरचा ठरला
मुरबाड येथील महसूल कार्यालयात सर्कल अधिकारी। म्हणून कार्यरत असलेले भूषण घोरपडे हे अंधेरी येथे राहतात. अंधेरीहून कल्याण आणि कल्याण ते मुरबाड असा त्यांचा रोजचा प्रवास. त्यांचा या अपघातात मृत्यू झाला. त्यांचा हा प्रवास अखेरचाच ठरला.























































