जे.जे.तील राजकारणाला कंटाळूनच वरिष्ठ अध्यापकांचे राजीनामे

सर जे. जे. रुग्णालयातील राजकारणाला कंटाळूनच ज्येष्ठ नेत्रशल्यविशारद डॉ. तात्याराव लहाने आणि नेत्रोपचार विभागातील वरिष्ठ डॉक्टरांनी सामूहिक राजीनामे दिले. त्याप्रकरणी चौकशी केली जावी, अशी मागणी आज विधानसभेत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केली. कॉंग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी यासंदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. जे. जे. रुग्णालयातील गैरप्रकार आणि राजकारणाला कंटाळून तेथील नेत्रोपचार विभागातील वरिष्ठ डॉक्टरांनी सामूहिक राजीनामे दिले. ही बाब गंभीर असून याप्रकरणी चौकशी केली पाहिजे, असे वडेट्टीवार म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल देशमुख यांनीही त्याला दुजोरा दिला. डॉ. लहाने, नेत्रोपचार विभागाच्या प्रमुख डॉ. रागिणी पारेख व अन्य डॉक्टरांवर राजकारण करून आरोप करण्यात आले. त्यांना राजीनामे देण्यास भाग पाडले गेले, असे देशमुख म्हणाले. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी डॉ. लहानेंनी स्वतःहून राजीनामा दिल्याचे यावेळी स्पष्ट केले.