केईएम इस्पितळात चोरी, आयसीयू वॉर्डबाहेरुन वृद्धेचा किमती ऐवज लांबवला

केईएम इस्पितळातील आयसीयू वॉर्डबाहेरून एका वृद्धेचे दागिने व क्रेडिट कार्ड अज्ञात व्यक्तीने चोरल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कल्याणच्या तिसगाव येथे राहणाऱ्या उषा शिंदे (64) या वृद्धेच्या मुलीला केईएम इस्पितळात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.  गेल्या तीन महिन्यांपासून ती आयसीयू वॉर्डात दाखल असल्याने तिची देखभाल करण्यासाठी उषा या इस्पितळात वॉर्डबाहेर थांबतात.  शुक्रवारी सायंकाळी उशिरा त्यांच्या मुलीला सीटी स्कॅन करण्यासाठी घेऊन जायचे होते. त्यामुळे उषा यांनी त्यांची छोटी बॅग व दोन कापडी पिशव्या या एका बेडशीटमध्ये गुंडाळून एका कोपऱ्यात ठेवल्या. दरम्यान, मुलीला सीटी स्कॅन करून आणल्यानंतर त्यांना त्यांच्या बॅगची चेन खोललेली असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी ती बॅग तपासली असता त्यातील दीड तोळय़ाची सोन्याची चेन, 6 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी व मुलाचे क्रेडिट कार्ड असा ऐवज लंपास झाल्याचे आढळून आले. त्यामुळे उषा यांच्या तक्रारीवरून भोईवाडा पोलिसांनी अज्ञात चोराविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.