थॉमस-उबर चषक बॅडमिंटन : इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा, हिंदुस्थान उपांत्यपूर्व फेरीत

गतविजेत्या हिंदुस्थानने इंग्लंडचा 5-0 फरकाने धुव्वा उडवत थॉमस-उबर चषक बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली. सलामीच्या लढतीत हिंदुस्थानने थायलंडचा 4-1 फरकाने पराभव करीत आपल्या अभियानास प्रारंभ केला होता. सोमवारी इंग्लंडवर एकतर्फी विजय मिळवत हिंदुस्थानने आगेकूच केली.

एच.एस. प्रणॉयने इंग्लंडच्या हॅरी हुआंगचा 21-15, 21-15 असा पराभव करीत हिंदुस्थानला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. मग सात्विक साईराज रंकिरेड्डी व चिराग शेट्टी या स्टार हिंदुस्थानी जोडीने इंग्लंडच्या बेन लेन व सीन वेंडी या जोडीचा 21-17, 19-21, 21-15 असा पराभव केला. माजी अव्वल मानांकित किदाम्बी श्रीकांतने इंग्लंडच्या नदीम दळवीवर 21-16, 21-11 असा सहज विजय मिळवत हिंदुस्थानची आघाडी 3-0 अशी आणखी भक्कम केली. मग एम.आर. अर्जुन व ध्रुव कपिला या हिंदुस्थानी जोडीने दुसऱया दुहेरी लढतीत रोरी इस्टन व अॅलेक्स ग्रीन या इंग्लिश जोडीचा 21-17, 21-19 असा पाडाव केला. त्यानंतर पाचव्या व अखेरच्या एकेरी लढतीत किरण जॉर्जने इंग्लंडच्या चोलान कायान याचा 21-18, 21-12 असा सहज पराभव करीत हिंदुस्थानला 5-0 असा दणदणीत विजय मिळवून दिला. आता अखेरच्या गटसामन्यात हिंदुस्थानपुढे 14 वेळच्या चॅम्पियन इंडोनेशियाचे आव्हान असेल.