युवतीवर ऍसिड फेकण्याची धमकी; चौघांना अटक, नगर शहरातील घटना

फ्रेंडशिप करण्याची मागणी करत महाविद्यालयीन युवतीचा पाठलाग करत तिला वारंवार त्रास देऊन अंगावर ऍसिड फेकण्याची धमकी दिल्याचा प्रकार नगर शहरातील प्रेमदान हडको परिसरात घडला आहे. याप्रकरणी तोफखाना पोलिसांत पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, चौघांना पोलिसांनी अटक केली आहे.

तेजस गावडे, परशुराम काकडे, सिद्धेश्वर काकडे, वैभव काकडे, अमोल चाळगे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

प्रेमदान हडको परिसरात राहणाऱया युवतीला वरील पाचजण अनेक दिवसांपासून त्रास देत होते. मंगळवारी (दि. 27) पिडीत मुलगी घरात एकटी होती. त्यावेळी आरोपीने तिच्या मोबाईलवर अश्लील मेसेज पाठवले. त्यानंतर रात्री 8च्या सुमारास तिच्या घराबाहेर येऊन मोठमोठय़ाने शिट्टय़ा वाजवल्या. तिला बाहेर येण्यासाठी हाका मारल्या. मात्र, ती बाहेर न आल्याने या आरोपींनी तिच्या घराचा दरवाजा वाजवला. ‘तू बाहेर आली नाहीस, तर आम्ही दरवाजा तोडून आत येवू. आमच्यासोबत बोलावेच लागेल. नाहीतर तुझ्या चेहऱयावर ऍसिड टाकून तुझा चेहरा विद्रूप करून टाकू, आम्ही हॉस्पिटलमध्ये काम करत असल्याने ऍसिड मिळणे अवघड नाही. तू आमच्या सोबत फिरायला आली नाही तर तुझ्या वडिलांना अपघातात मारून टाकू’, अशा धमक्या दिल्या.

या आरोपींनी यापूर्वीही त्या युवतीचा कॉलेजला जाताना अनेकवेळा पाठलाग केला आहे. ‘आमच्यासोबत बोलली नाही तर फेसबुक व गुगलवर तुझा नंबर टाकून तुझी बदनामी करू’, अशा धमक्याही अनेकवेळा आरोपींनी दिल्या. त्यामुळे पीडितेने कुटुंबीयांसमवेत गुरुवारी (दि.29) रात्री तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.