मणिपुरात अंदाधुंद गोळीबारात तीन जण ठार

manipur
फाईल फोटो

गेल्या पाच महिन्यांपासून पेटलेले मणिपूर अद्याप शांत झालेले नाही. या ठिकाणी रोज नवीन हिंसाचार उसळत असून यात नागरिकांचा जीव जात आहे. मणिपूरमधील कांगपोकपी येथे मंगळवारी अंदाधुंद गोळीबार करण्यात आल्याने तीन जणांचा मृत्यू झाला आहे. हा गोळीबार अज्ञातांकडून करण्यात आल्याची माहिती आहे. हल्लेखोरांनी कांगगुई परिसरातील इरेंग आणि करम वैफेई गावादरम्यान सकाळी 8.20 वाजता ग्रामस्थांवर अंदाधुंद गोळीबार केला.

मणिपुरात याआधी 8 सप्टेंबर रोजी हिंसाचारात तीन जण ठार झाले होते. तसेच 50 हून अधिक जण जखमी झाले होते. आतापर्यंत 160 हून अधिक लोकांचा जीव गेला आहे. सिविल सोसायटी यूथ ऑफ मणिपूरने सोमवारी भाजप आमदारांसोबत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. वेगळ्या प्रशासनाची मागणी करणाऱया 10 कुकी आमदारांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. यासाठी विधानसभेचे एक विशेष अधिवेशन बोलावून राज्यात  एनआरसी लागू करण्याची मागणी सुद्धा केली आहे.

कुकी आमदारांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी

भाजपच्या 23 आमदारांनी मंगळवारी, 12 सप्टेंबर रोजी एक प्रस्ताव मंजूर केला आहे. या प्रस्तावानुसार, 10 कुकी आमदारांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. यासाठी भाजप आमदारांनी प्रस्तावासोबत मुख्यमंत्री एन. वीरेन सिंह यांची भेट घेतली. राज्यात कुकी समाजासाठी वेगळ्या प्रशासनाची मागणी कुकी आमदारांनी केली आहे. याला भाजप आमदारांनी विरोध दर्शवला आहे.