‘माथेरानच्या राणी’ला पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; वर्षभरात 3.54 कोटींची कमाई

माथेरानला पर्यटकांची नेहमीच पसंती असते. माथेरानचे आकर्षण म्हणजे येथील माथेरानची राणी म्हणजेच येथील टॉय ट्रेन. या टॉयट्रेनला पर्यटकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. 2023-24 या आर्थिक वर्षात टॉयट्रेनने 5 लाख प्रवाशांना सेवा दिली असून 3.54 कोटींचा महसूल मिळवला आहे.

मुंबई, पुणे येथील पर्यटकांना माथेरान हे सर्वात जवळचे पर्यटनस्थळ आहे. 117 वर्षांपूर्वी सुरू झालेली नेरळ-माथेरान टॉय ट्रेन ही देशातील ऐतिहासिक पर्वतीय रेल्वे सेवांपैकी एक आहे. मध्य रेल्वे नेरळ ते माथेरानपर्यंत अरुंद गेज मार्गावर टॉय ट्रेन सेवा चालवते. त्यात अमन लॉज ते माथेरान दरम्यान शटल सेवेचाही समावेश आहे. सध्या नेरळ- माथेरान – नेरळ दरम्यान दररोज 4 फेऱ्या आणि अमन लॉज-माथेरान-अमन लॉज दरम्यान 16 फेऱ्या चावण्यात येतात. त्यापैकी 12 फेऱ्या दररोज चालतात,तर 4 विशेष फेऱ्या शनिवार,रविवार चालवण्यात येतात.

2023-24 या आर्थिक वर्षात माथेरानमध्ये एकूण 5 लाख प्रवासी वाहतूक करण्यात आली असून त्यात अमन लॉज ते माथेरान दरम्यान 3.75 लाख प्रवासी आणि नेरळ ते माथेरान दरम्यानच्या 1.25 लाख प्रवाशांचा समावेश आहे. या आर्थिक वर्षात अमन लॉज आणि माथेरान दरम्यान 2.48 कोटी कोटी आणि नेरळ आणि माथेरान दरम्यान 1.06 कोटींसह 3.54 कोटींचे एकूण उत्पन्न आहे.