‘एक देश एक निवडणुकी’पेक्षा पारदर्शी निवडणुका घ्या! उद्धव ठाकरे यांचे परखड मत

‘ईव्हीएम’च्या घोळामुळे अनेक देशांत यावर बंदी घालण्यात येत आहे. या ‘ईव्हीएम’ आपल्याच देशातून पुरवल्या जात होत्या असा अंदाज आहे. त्यामुळे सरकारने वन नेशन, वन इलेक्शनपेक्षा पारदर्शी निवडणुका घ्याव्यात, असे परखड मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.

‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी केंद्राच्या नव्या प्रस्तावित ‘प्रयोगा’वर बोलताना सडकून टीका केली. निवडणुका घेणारच असाल तर लोकसभेसोबत विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकादेखील घेणार का, असा सवालही त्यांनी केला. ‘इंडिया’च्या माध्यमातून यापुढे लोकांमध्ये त्यांची मते जाणून घेणार असल्याचे ते म्हणाले. शिवाय पाटणा, मुंबईसह प्रत्येक राज्यात ‘इंडिया’च्या जाहीर सभा होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात सध्या दुष्काळजन्य स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या ठिकाणी पावसाच्या स्थितीनुसारच सभा घेण्यात येतील, असेही ते म्हणाले. ‘इंडिया’मध्ये महाराष्ट्रातील ‘शेकाप’ आला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्याशीही चर्चा सुरू आहे. तसेच प्रत्येक राज्यात विविध पक्षांची चर्चा सुरू असून ‘इंडिया’ आणखी भक्कम होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, ‘इंडिया’साठी संयोजकाची गरज नाही. कारण समन्वयासाठी कमिटय़ा नेमल्या आहेत. या कमिटय़ा आपापल्या पक्षप्रमुखांना थेट रिपोर्ट करणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. जनता जर स्वीकारत असेल तर परिवारातील माणसाला विरोध करण्याची गरज काय, असा सवालही त्यांनी केला. कोरोना काळात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ धोरण राबवले. त्याचप्रमाणे सारा देश आपली जबाबदारी असली पाहिजे, असेही ते म्हणाले.

भाजप सरकार हिंदुद्वेष्टे

मुंबई-महाराष्ट्रासह संपूर्ण देशात 19 सप्टेंबरपासून गणेशोत्सव सुरू होत असताना केंद्र सरकारने अचानक 18 ते 22 सप्टेंबर या कालावधीत तातडीचे संसदीय अधिवेशन बोलावले आहे. हिंदूंचा महत्त्वाचा सण असताना याच कालावधीत अधिवेशन बोलावणे चुकीचे असल्याचे सांगत भाजप सरकार हिंदुद्वेष्टे असल्याची टीकाही त्यांनी केली. गणपतीला विघ्नहर्ता असेही म्हणतात. त्यामुळे त्याच्या आगमनाने देशावरचे विघ्न टळत असेल तर आनंदच होईल, असा टोलाही त्यांनी लगावला.