गडचिरोली-चंद्रपुर महामार्गावर ट्रॅव्हल्स बस पलटली, 25 प्रवासी जखमी

गडचिरोली-चंद्रपुर महामार्गावर भरधाव वेगात असलेल्या ट्रॅव्हल्स बसला मध्यरात्री अपघात झाला. गडचिरोली-चंद्रपुर महामार्गावरील मूल जवळ हा अपघात झाला. या अपघातात ट्रॅव्हल्स बस रस्त्याच्या कडेला पलटल्याने 25 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. ही ट्रॅव्हल्स बस छत्तीसगड येथून प्रवाशांना घेऊन हैदराबादला जात होती.

अपघाताची माहिती मिळताच मूल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातातील जखमींना उपचारासाठी तातडीने मूल रुग्णालयात हलवण्यात आले. या अपघात प्रकरणी मूल पोलीस अधिक तपस करत आहेत.

नुकताच समृद्धी महामार्गावर थरकाप उडवणारा भीषण अपघात घडला. यात 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला. राज्यात खासगी बसच्या अपघातांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.