ठाण्यात मिंध्यांच्या मिरवणुकीत गँगवॉर, भररस्त्यात दोन टोळय़ा एकमेकांना भिडल्या

लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघालेले मिंधे गटाचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या रॅलीत आज ‘गँगवॉर’ झाले. मिंध्यांच्या रॅलीत सहभागी झालेल्या गुंडांच्या दोन टोळय़ा भररस्त्यात एकमेकांना भिडल्या आणि तुफान राडा झाला. या घटनेने ठाण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले.

हे दोन्ही गुंड मुख्यमंत्र्यांच्या जवळचे असल्याने सार्वजनिक ठिकाणी पोलिसांदेखत हाणामारी केल्यानंतरही याची दखल पोलिसांनी घेतली नाही. पोलिसांनी गर्दी पांगवली व काहीच झाले नाही असे दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र कॅमेऱयात हा सगळा प्रकार कैद झाला आहे. या प्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. दरम्यान सिद्धू अभंगे आणि अजय पासी यांच्यावर हाणामारी, अमली पदार्थ बाळगणे, खंडणी, अवैध पद्धतीने शस्त्र बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे आहेत.

या गुंडांचा व्यापारी,बांधकाम व्यावसायिकांनी घेतला धसका

सुसंस्कृत ठाणे शहरात गेल्या दीड वर्षापासून भाईगिरी, खून, दरोडे यासारखे गंभीर गुन्हे घडत आहेत. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या अधिवेशनात याची जाहीर वाच्यता केली होती. सध्या याच गुंडागर्दीमुळे ठाणे शहरातील व्यापारी, बांधकाम व्यावसायिकांनी धसका घेतला आहे. हे गुंड मुख्यमंत्र्यांच्या जवळचे असल्याने अवैध पद्धतीने वसुली करून उदरनिर्वाह करतात. विरोधी पक्षातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना भीती दाखवण्यासाठी मुख्यमंत्री याच गुंडांचा वापर करीत असतात.

हेच गुंड उद्या अंगावर आले तर नवल वाटायला नको

‘आपण जे पेरतो, तेच उगवत असतं. ज्या गुंडांना गेली अडीच वर्षे राजाश्रय दिला होता. त्या गुंडांच्या टोळ्यांमध्ये भररस्त्यात उघडपणे मारामारी झाली. स्वतः मुख्यमंत्री ज्या पक्षाचे नेते आहेत, ते ज्या शहरात राहतात त्याच शहरात त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराच्या मिरवणुकीत टोळीयुद्ध होणार असेल तर हे महाराष्ट्रासाठी लज्जास्पद आहे. आपण कोणाला जवळ ठेवतो आणि कोणाला मोठं करतो, याचे भान प्रत्येक राजकीय पक्षाने ठेवायला हवे. आज ते एकमेकांच्या अंगावर गेलेत. कारण ते कुणाचेच नसतात. उद्या ते तुमच्या अंगावर आले तर नवल वाटायला नको, असा इशारा आव्हाड यांनी एक्सवर ट्विट कर दिला आहे.

उमेदवाराला आपला अर्ज दाखल करण्यासाठी गुंड आणावे लागतात. पोलिसांच्या साक्षीने मारामारी होत आहे. यावरून ठाण्यात गुंड मोकाट सुटलेले आहेत. एकीकडे आमच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केले जात असतात. मात्र इथे काहीही कारवाई होत नाही. आता यांच्यावर जनताच कारवाई करेल.- राजन विचारे(उमेदवार – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

– काही दिवसांपूर्वी मिंधे गटात प्रवेश केलेला अजय पासी आणि युटय़ूब भाई म्हणून कुप्रसिद्ध असलेला सिद्धू अभंगे मिरवणुकीत आपल्या साथीदारांसह सहभागी झाले होते.
– हे दोन्ही गुंड मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातील कोपरी परिसरातच राहत असून वर्चस्वासाठी या दोन्ही टोळ्यांमध्ये कित्येक वर्षांपासून वैमनस्य आहे. या टोळ्यांमधून विस्तव जात नाही.
– मिरवणूक बाजारपेठेतील मराठी ग्रंथालयासमोर आली असतानाच दोन्ही टोळ्यांचे म्होरके एकमेकांसमोर आले व गँगवॉर भडकले.