मोदींचा मित्र परिवारवाद संपवणार! – उद्धव ठाकरे

येत्या निवडणुकीत हुकूमशाही, जुमलेबाज, भ्रष्टाचारी मोदी सरकारला सत्तेतून खाली खेचण्यासाठी इंडिया आघाडी सज्ज झाली असून, नरेंद्र मोदींच्या मित्रपरिवारवादाविरुद्धही एकत्रितपणे लढा देऊन तो संपवणार, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. सब का साथ सब का विकास नारा द्यायचा आणि सत्ता आल्यानंतर सर्वांना लाथ आणि मित्रांचा विकास हे चालू देणार नाही, असे त्यांनी ठणकावले.

इंडिया आघाडीची तिसरी बैठक मुंबईत यशस्वीरीत्या पार पडली, त्याबद्दल आघाडीतील सर्व मातब्बर नेत्यांचे उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले. इंडिया आघाडी दिवसेंदिवस मजबूत होत असून देशभक्त पक्ष एकत्र येताहेत, वाढताहेत हे पाहून विरोधकांमध्ये घबराट पसरली आहे, असे ते म्हणाले. आम्ही देशप्रेमी लोक असून देशविरोधी लोकांविरुद्ध लढणार. येणाऱया काळात आघाडीतील सर्व पक्ष मिळून हुकूमशाहीच्या, मित्रांसाठीच काम करणाऱयाच्या विरोधात लढण्याचा निर्धार केला आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

गॅसचे दर घटवून डाळी महाग केल्या तर शिजवणार काय?

गॅसचे दर कमी करण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयावरही उद्धव ठाकरे यांनी टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, ‘गॅस स्वस्त केला पण 2014 मध्ये गॅसचे दर काय होते हे लोकांना चांगले माहीत आहे. पाच वर्षे लूट आणि निवडणुकीच्या वेळेस सूट असे मोदी सरकारचे धोरण आहे.’ एकीकडे गॅसची किंमत कमी करून दुसरीकडे डाळी महाग केल्या, मग त्या गॅसवर शिजवणार काय, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.

ही लढाई सर्व देशवासीयांची; ती जिंकणारच

‘मोदी सरकारच्या काळात जनतेच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्वत्र अत्याचार सुरू आहेत. अर्ध्या रात्री उठून घोषणा केल्या जात असल्याने जनतेमध्ये दहशत आहे. पण घाबरू नका. डरो मत. भयमुक्त हिंदुस्थानसाठी आम्ही एकत्र आलोय. ही लढाई केवळ इंडिया आघाडीची नाही, तर सर्व देशवासीयांची आहे आणि ती जिंकणारच’, असा जबरदस्त विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

आम्ही जनतेचा लढा लढत असल्यामुळे ‘इंडिया’च्या लोगोबाबत लोकांच्या सूचना घ्यायला काहीच हरकत नाही. यामुळे आमच्या लढय़ात पहिल्या दिवसापासून लोकांचा सहभाग राहील. लोगोबाबत कोणताही संभ्रम नसून लोकांच्या सूचना घेऊनच ‘इंडिया’चा लोगो जाहीर होईल, असे उद्धव ठाकरे म्हणाले.