मोदी सरकार हे गझनी सरकार; गायीवर बोलता तसे महागाईवर बोला – उद्धव ठाकरे

भाजपवाले नालायक आहेत. शिवसेना त्यांच्यासाठी मते मागत होती. कुणीही त्यांना जवळ घ्यायला तयार नव्हते तेव्हा शिवसेनेने खांद्यावर बसवून महाराष्ट्र दाखवला. नाहीतर त्यांना खांदा द्यायलाही महाराष्ट्रात माणूस दिसला नसता.

>> शीतल धनावडे 

मोदींच्या फालतू गप्पा खूप झाल्या. हे मोदी सरकार नाही, तर गझनी सरकार आहे. काल काय बोलले ते आज आठवत नाही. 2014 ला बोलले ते 2019 ला आठवत नाही आणि 2019 चे 2024 ला आठवत नाही. उद्या लोक मोदींनाही विसरतील. मग जा काळाच्या पडद्याआड, विस्मृतीच्या पडद्याआड, असा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केला. गायीवर बोलता तसे महागाईवरही बोला. चाय पे चर्चा केलीत तशी चर्चा मुद्दय़ांवरही करा, असे आव्हानच त्यांनी मोदींना दिले.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे शिवसेना उमेदावर सत्यजित आबा पाटील यांच्या प्रचारासाठी इचलकरंजी येथे तर कोल्हापुरातील गांधी मैदानावर महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचारासाठी झंझावाती सभा झाल्या. यावेळी मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाच्या हुकूमशाहीवर कडकडीत आसूड ओढले.

उद्धव ठाकरे यांनी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन करून सभेला संबोधित करायला सुरुवात केली. केवळ दिवस सापडत नव्हता म्हणून 1 मे हा महाराष्ट्र दिन म्हणून ठरवला गेला नाही. संयुक्त महाराष्ट्रासाठी ज्यांनी लढा दिला, रक्त सांडले, हुतात्मे झाले त्या संघर्षाची यशोगाथा सांगणारा हा दिवस आहे, असे ते म्हणाले.

महाराष्ट्राबद्दलचा आकस संयुक्त महाराष्ट्र आंदोलनावेळीही दिसला होता असे सांगताना उद्धव ठाकरे म्हणाले की, संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात 105 हुतात्मे झाले असे सांगतात, पण तो आकडा कागदोपत्री आहे. त्यावेळी ताया झिनकीन नावाच्या महिला पत्रकार मुंबईत आल्या होत्या. त्यांनी लिहून ठेवलेय की, त्या रुग्णालयात गेल्या होत्या तेव्हा त्यांच्यासमोर दोनशे-अडीचशे मृतदेह पडले होते.

तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी मराठी माणसांना मारण्यासाठी गोळीबाराचे आदेश दिले होते. मराठी माणसे मेली तरी चालतील पण गोळी वाया जाता कामा नये, असे आदेशच त्यांनी पोलिसांना दिले होते, असे उद्धव ठाकरे म्हणाले. मोरारजींनी परळ-लालबागच्या कामगार वस्तींमधील चाळींमध्येही पोलिसांना पाठवून खिडक्यांमधून अश्रूधूर सोडला होता. त्याच्या निषेधार्थ तेथील महिला रस्त्यावर उतरल्या होत्या असा इतिहासही उद्धव ठाकरे यांनी सांगितला. मोदी-शहा इतक्या संघर्षातून मिळवलेल्या मुंबईचे महत्त्व मारायला निघालेत, असा संतापही त्यांनी व्यक्त केला.

हुकूमशाहीचा व्हायरस गाडून टाका, असे आवाहनही यावेळी उद्धव ठाकरे यांनी केले. ते म्हणाले की, शिवसेना आजपर्यंत फसली. शिवसेनेचा चेहरा वापरून भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राला मुळापासून नासवून टाकतोय, तंगडतोड करून महाराष्ट्राला लुळापांगळा करतोय हे कळलेच नाही, असे ते म्हणाले. महाराष्ट्राला लुळापांगळा करणाऱ्या, महाराष्ट्र ओरबाडणाऱ्या हुकूमशाहीला यापुढे या मातीतून एकही मत मिळता कामा नये, असे त्यांनी हातकणंगलेकरांना सांगितले. कोरोनापासून ठेवलेत तसे भाजपच्या हुकूमशाहीपासून दहा हातांचे अंतर ठेवा, असा हल्लाबोलही त्यांनी केला.

कोल्हापुरातील शिवशाहू निर्धार सभेतही उद्धव ठाकरे यांनी भाजपसह मोदी-शहांचा समाचार घेतला. मुंबईच्या हुतात्मा चौकात शेतकरी आणि कामगाराची मूर्ती आहे आणि त्यांच्या हातात मशाल आहे. तीच मशाल घेऊन मी पुढे निघालोय, असे म्हणत त्यांनी हुतात्म्यांच्या स्मृती जागवल्या.  उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपस्थित जनसमुदायाला दोन प्रश्न विचारले. महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज, शाहू-फुले-आंबेडकरांचा आहे की शहा-मोदी-अंबानींचा? त्यावर शाहू-फुले आंबेडकरांचा अशा एकमुखी उत्तराने गांधी मैदान दुमदुमले. तोच महाराष्ट्र आपण टिकवणार की शहा-मोदी-अदानींच्या हाती देणार, या प्रश्नावरही कोल्हापूरकरांनी शाहू-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र टिकवणार अशी ग्वाही दिली.

कोल्हापुरातील भाजपचे माजी नगरसेवक आर. डी. पाटील यांनी गौप्यस्पह्ट केला. लोकसभेत मोदींना पाठिंबा देणार म्हणून शिवसेनेने भाजपसाठी काम केले, पण भाजपने विधानसभेत शिवसेनेची ताकद कमी करायला पाहिजे म्हणून शिवसेनेचे उमेदवार पाडले. आता लोकसभेला भाजपला पाडून तो सूड घ्यायला आलो आहे, असे उद्धव ठाकरे यावेळी कडाडले.

कोल्हापूर म्हणजे अस्सल पांढरा तांबडा रस्साच पाहिजे झणझणीत. आम्हाला गुळमुळीत काय लागतच नाही. म्हणूनच म्हणतात ना लवंगी मिरची. त्या मिरचीचा झटका द्या भाजपला, असे उद्धव ठाकरे म्हणताच एकच हशा पिकला.

सभेला तेजस ठाकरे उपस्थित होते. व्यासपीठावर काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आपचे खासदार संजय सिंह, शिवसेना उपनेते व जिल्हासंपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, उपनेते व जिल्हाप्रमुख संजय पवार, सहसंपर्कप्रमुख विजय देवणे,जिल्हाप्रमुख संजय पवार, आमदार मानसिंग नाईक,  सुजित मिणचेकर, राजू आवळे,  सुरेश साळोखे, संजय घाटगे, संभाजीराजे छत्रपती, मालोजीराजे छत्रपती, आमदार सतेज पाटील, पी. एन. पाटील, ऋतुराज पाटील, जयश्री जाधव, शिवाजी परुळेकर उपस्थित होते.

भाजप म्हणजे मुलं पळवणारी टोळी

महत्त्वाच्या मुद्दय़ांवरून लोकांचे लक्ष हटवून कोण मांस-मच्छी खातो, कुणाला किती मुले होतात यावरून जनतेची दिशाभूल भाजप करत आहे. तुम्हाला राजकारणामध्ये मुलं होत नाहीत म्हणून आमच्यातले गद्दार चोरून तुम्हाला उभे करावे लागतात. भाजप म्हणजे मुलं पळवणारी टोळी आहे.भाजपने शिवसेनेची 40 पोरं चोरली. शरद पवारांचीही चोरली. पण त्यानंतरही महाराष्ट्रातील करोडो लोक आमच्या खांद्याला खांदा लावून तुमचा सुपडा साफ करायला उतरलेत, असे उद्धव ठाकरे यांनी भाजपला बजावून सांगितले.

एलन मस्क हुशार आहे, मोदींची भेट पुढे ढकलली

उद्योग पळवण्याच्या भाजपच्या धोरणाबद्दल बोलताना उद्धव ठाकरे यांनी यावेळी टेस्ला कंपनीचेही उदाहरण दिले. टेस्लाचा उद्योग हिंदुस्थानात येतोय. पण या कंपनीचा प्रमुख एलन मस्क फार हुशार आहे. त्याला माहीत आहे, आता जर आला असता तर त्याचा उद्योग गुजरातला पळवला असता. त्याला गुजरातला जायचे नाही. कारण आता देशातले सरकार बदलतेय. म्हणून त्याने मोदींची भेटही पुढे ढकलून चीनमध्ये जाऊन बसलेत. हिंदुस्थानातले सरकार बदलतेय हे आता जगभर झालेय, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

सुरतेचे दोघे जण महाराष्ट्राला लुटताहेत, त्यांना नेस्तनाबूत करणारच

छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती. आता सुरतेचे दोघे जण महाराष्ट्राला लुटताहेत. छत्रपतींच्या महाराष्ट्राला जे लुटताहेत, लुबाडताहेत, ओरबाडताहेत मग ते कुणीही असोत, त्यांना नेस्तनाबूत केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी यावेळी मोदी-शहांना दिला. महाराष्ट्राच्या लुटारूंचा सुपडा साफ केल्याशिवाय राहणार नाही अशी शपथ घेऊनच आपण मैदानात उतरलोय, असे त्यांनी ठणकावून सांगितले.

…तर लष्कर आणि हुकूमशाहीचा देशाला वेढा पडेल!

हिंदुस्थानला कधी लष्कराने आणि हुकूमशाहीने वेढा टाकला हे पाहिलं नव्हतं. पण तशी स्थिती आणण्याचे भाजप नेतृत्वाचे मनसुबे दिसत आहेत. तेव्हा तुम्हाला जागं राहावं लागेल, अशी साद राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घातली. एका बाजूला मोदी म्हणतात, या रस्त्याने आम्ही जाणार नाही. आणि दुसऱ्या बाजूला त्यांचेच संसदेतील सहकारी संविधान बदलण्यासाठी मोदींना शक्ती द्या असे म्हणतात. त्यामुळे मोदी आज काहीही म्हणोत, सत्ता आली तर संविधान बदलण्याची सुप्त इच्छा ते पूर्ण करतील, असे पवार म्हणाले.

नेमकी लोकसभा निवडणुकीवेळीच अरविंद केजरीवाल यांना अटक का केली, असा प्रश्न सर्वेच्च न्यायालयाने ईडीला केला आहे. म्हणजेच आवश्यकता नसताना घाईने केजरीवालांना अटक केल्याचे स्पष्ट होते. दुसऱ्या अर्थाने आपण हुकूमशाहीकडे जात नाही आहोत का? तसे झालेच तर या देशातील लोकांचा मूलभूत अधिकारच उद्ध्वस्त होईल.