प्रख्यात गीतकार देव कोहली काळाच्या पडद्याआड, 82व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

बॉलिवूडचे प्रख्यात गीतकार देव कोहली यांचे निधन झाले. वयाच्या 82व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. देव कोहली यांचे प्रवक्ते प्रीतम शर्मा यांनी यास दुजारा दिला आहे. देव कोहली गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते आणि त्यांच्यावर मुंबईतील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात उपचार सुरू होते. शनिवारी सकाळी झोपेतच त्यांचे निधन झाले, अशी माहिती शर्मा यांनी दिली.

शंकर-जयकिशनपासून विशाल आणि शेखरपर्यंत अनेक आघाडीच्या संगीतकारांबरोबर देव कोहली यांनी काम केले होते. त्यांच्या जाण्याने सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, देव कोहली यांचे पार्थिव मुंबईतील लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून जोगेश्वरी पश्चिम येथील ओशिवरा स्मशानभूमीत सायंकाली 6 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

देव कोहली यांनी सलमान खानच्या ‘मैंने प्यार किया’, माधुरी दीक्षितच्या ‘हम आपके हैं कौन’, शाहरूख खानच्या ‘बाजीगर’सह ‘शूट आउट एट लोखंडवाला’, ‘जुडवा 2’, ‘टॅक्सी नंबर 9211’ आणि ‘मुसाफिर’ यासारख्या 100हून अधिक चित्रपटांसाठी गाणी लिहिली होती.