प्रासंगिक – शिवरायांचा आठवावा प्रताप…!

>> विलास पंढरी

अतिशय खडतर परिस्थिती असताना शून्यातून हिंदवी स्वराज्य निर्माण करणारे एकमेव महापुरुष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांच्या राज्याभिषेकाला यंदा 350 वर्षे पूर्ण होत असल्याने अनन्यसाधारण महत्त्व असून तसेच साजरे केले जात आहे. 350 वर्षांपूर्वी शिवराज्याभिषेक सोहळा झाला तो 19 फेब्रुवारी 1630 रोजी. असे म्हटले जाते की, महात्मा फुले यांनी पुण्यापासून 100 किमी अंतरावर असलेल्या रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि 1870 साली छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्याची पुण्यात सुरुवात केली. नंतर लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणपतीप्रमाणेच शिवजयंती साजरी करण्याची परंपरा पुढे नेली.

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती महाराष्ट्रामध्ये तिथी आणि तारखेनुसार केली जाते. राज्य सरकारकडून 19 फेब्रुवारी या दिवशी शासकीय सुट्टी जाहीर केली जाते. या दिवशी अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आणि मिरवणुकीचे आयोजन केले जाते. आज छत्रपती शिवाजी महाराज यांची 394 वी जयंती साजरी होत आहे. शिवाजी महाराजांचे कार्य एवढे मोठे आहे की, त्यावर कितीही लिहिले तरी कमीच पडेल. त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटनांचा आणि त्यांच्याबद्दल थोरामोठय़ांनी व्यक्त केलेल्या मतांचा अगदी थोडक्यात घेतलेला आढावा.

शिवाजी महाराजांच्या चरित्रावर वडील शहाजीराजे आणि आई जिजाऊ माँसाहेब यांचा खूप प्रभाव होता. त्यांचे बालपण जिजाऊ माँसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गेले. त्यांनी महाराजांच्या शिक्षणाची जबाबदारी घेऊन त्यांना युद्धकला, राजनीती आणि परकीय सत्तेविरुद्ध यशस्वी सामना करण्यासाठी लागणाऱया शिस्तीचे प्रशिक्षण दिले. परिणामी इतक्या लहान वयातदेखील महाराज सगळय़ा घटना समजायला लागले होते. शिवराय लहानाचे मोठे शिवनेरी येथे झाले, तसेच त्यांचे बालपण माहुली व पुणे येथेही गेले. शहाजी महाराजांनी शिवाजी आणि जिजाऊ यांच्या हाती संपूर्ण महाराष्ट्राच्या जहागिरीची व्यवस्था सोपवून त्यांना पुण्याला पाठवले. जिजाऊंमध्ये असलेला कणखरपणा, देशासाठी असलेले प्रेम आणि कठीण प्रसंगातून बाहेर येण्याचे गुण शिवाजी महाराजांमध्ये तयार झाले. माँसाहेबांकडून मिळालेल्या शिकवण आणि प्रेरणेतून शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्माण करण्याची ओढ निर्माण झाली. वयाच्या सोळाव्या वर्षामध्ये शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. आपल्याच वयाचे धाडसी मावळे त्यांनी जमवले आणि त्यासोबतच त्यांनी देशपांडे, देशमुख इत्यादींशी वेगळय़ा प्रकारे संबंधदेखील साधले. स्वराज्याचे निर्माण आणि रक्षण करायचे असेल तर त्यासाठी गडकिल्ले आपल्या ताब्यात पाहिजेत ही जाणीव त्यांना लहानपणातच झाली होती. पुण्याच्या परिसरातील काही पडके किल्ले, टेकडय़ा हळूहळू आपल्या ताब्यात घ्यायला सुरुवात केली. त्याकाळी साधारणतः ज्याच्या हातात किल्ला तोच प्रांतावर राज्य करणार असे मानले जायचे. या वस्तुस्थितीमुळे शिवाजी महाराजांनी आपल्या प्रदेशातील अनेक किल्ले परत मिळवले आणि काही नवीन किल्लेदेखील बांधले. 1647 मध्ये कान्होजी जेधे, बाजी पासलकर, तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, सूर्याजी काकडे, येसाजी कंक, बापूजी मुदगल, सोनोपंत डबीर या काही मुख्य मावळय़ांच्या साथीने तोरणा किल्ला आपल्या ताब्यात घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले आणि त्यांनी प्रचंडगड किल्ल्याचे नाव तोरणा असे ठेवले. त्याचदरम्यान शिवाजी महाराजांनी कोंढाणा म्हणजे सिंहगड आणि पुरंदर असे किल्लेदेखील आदिलशहाच्या ताब्यातून मिळवले व पुणे प्रांतावर पूर्णपणे आपले वर्चस्व सिद्ध केले. इतकेच नव्हे तर तोरणा किल्ल्यासमोर असणारा मुरुंबदेवाचा डोंगरदेखील महाराजांनी आपल्या ताब्यात घेऊन त्याला दुरुस्त करून त्याचे नाव राजगड असे ठेवले. 1674 मध्ये पश्चिम हिंदुस्थानमध्ये हिंदवी साम्राज्याचा पाया घातला. त्यासाठी महाराजांना मोगल साम्राज्याचा औरंगजेब, विजापूरचा आदिलशहा आणि इंग्रज यांच्याशीदेखील युद्ध करावे लागले. 1674 मध्ये महाराजांचा रायगड येथे राज्याभिषेक झाला आणि ते हिंदवी साम्राज्याचे छत्रपती बनले. छत्रपती शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान नेमून त्यांच्या शिस्तबद्ध सुव्यवस्थित प्रशासकीय तुकडय़ांच्या मदतीने एक कार्यक्षम पुरोगामी प्रशासन तयार केले. त्यांनी युद्धनीतीमध्ये अनेक नावीन्यपूर्ण गोष्टी आणल्या आणि गनिमी युद्धांची एक नवीन शैली विकसित केली. त्यांनी प्राचीन हिंदू राजकीय पद्धती आणि रयतेला न्याय देण्याचे शिष्टाचार पुनरुज्जीवित केले. शिवाजी महाराजांमधील नेतृत्वगुण, धुरंधर सेनानी, जाणता राजा ही आणि अशा असंख्य गुणांची ओळख आपल्याला पदोपदी होत आली आहेच. त्यांच्या या कार्यशैलीमुळेच छत्रपती शिवाजी महाराज आजही आणि अनंतकाळापर्यंत वंदनीय व अनुकरणीय राहतील.