वाणगावातील महिला रस्त्यावर, पाण्याने तुडुंब भरलेल्या साखरे धरणावर तहानलेल्या गावकऱ्यांचा हंडा मोर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गावाशेजारी धरण असूनही डहाणू तालुक्यातील साखरे ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. ‘धरण उशाला आणि कोरड घशाला’ अशी विदारक परिस्थिती निर्माण झालेल्या साखरे गावातील ग्रामस्थांनी आज पाण्याने तुडुंब भरलेल्या साखरे धरणावर हंडा मोर्चा काढत तीव्र आंदोलन छेडले. महिला, मुले, ज्येष्ठ नागरिक सर्वच रस्त्यावर उतरले. तहानलेल्या गावकऱ्यांनी अधिकाऱ्यांना घेराव घालत पाणीटंचाई सोडवण्याची मागणी केली.

साखरे गावात तीव्र पाणीटंचाई असल्याने महिलांना हंडाभर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पाणी योजना सुरू करण्यासाठी ग्रामस्थांनी अनेक वेळा प्रशासनाकडे पाठपुरावा केला. वारंवार निवेदने दिली. मात्र अधिकारी दाद देत नसल्याने आज ग्रामस्थांनी साखरे गावातून साखरे धरणापर्यंत हंडा मोर्चा काढत धरण परिसरात ठिय्या आंदोलन केले. यानंतर जीवन प्राधिकरणाचे उपअभियंता महेश पाटील, जिल्हा परिषदेच्या उपअभियंता अस्मिता राजापुरे, आर. सी. पाटील या अधिकाऱ्यांनी पाणी योजना लवकरात लवकर सुरू करण्याचे आश्वासन दिले. यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनात सरपंच रेखा कवटे, उपसरपंच हर्षद मेढा, ब्रायन लोबो, भारती मेढा, प्रमिला दुमाडा, सचिन मेढा, अशोक गडग यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते.

सहा वर्षांपासून काम बंद

साखरे धरणातून तालुक्यातील विविध भागांना पाणीपुरवठा केला जात असताना धरणाच्या परिसरातील साखरे गाव मात्र पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहे. गावात सहा वर्षांपूर्वी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि जिल्हा परिषदेमार्फत जलकुंभ उभारण्यात आला. जलवाहिनीचे कामही करण्यात आले. मात्र काम अर्धवट राहिल्याने आजतागायत गावातील नागरिकांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही.