
उल्हासनगर शहरात तीव्र पाणीटंचाई भेडसावत आहे. शहरवासीयांना आठवड्यातील तीन दिवस बिनपाण्याचे काढावे लागत आहेत. कॅम्प नंबर 4 आणि 5 मधील नागरिक तर पाणीटंचाईने बेजार आहेत. पाणी विकत घेण्याचा भुर्दंड नागरिकांना सहन करावा लागत आहे. शटडाऊनमुळे वितरण व्यवस्थेवर परिणाम झाल्याने कृत्रिम पाणीटंचाईचा सामना शहरवासीयांना करावा लागत आहे.
उल्हासनगर पूर्वेकडील कॅम्प नंबर 4 आणि 5 मध्ये एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. गुरुवारी पाणी मिळाल्यानंतर शुक्रवारचा शटडाऊन येतो आणि वितरण व्यवस्था स्थिरस्थावर होईपर्यंत शनिवारही जातो. त्यामुळे गुरुवारी पाणी आल्यानंतर नागरिकांना पाण्यासाठी रविवारपर्यंत वाट पाहावी लागते. त्यामुळे उल्हासनगरातील नागरिकांवर तीन दिवस बिनपाण्याचे काढावे लागत आहेत. त्यातही महावितरणचा विजेचा लपंडाव, एमआयडीसीच्या अडचणी लक्षात घेता रविवारीसुद्धा निश्चितपणे पाणी मिळेल की नाही याची काहीही शाश्वती नसते. पाणी पुरवठ्याच्या अनिश्चित परिस्थितीमुळे जर नागरिकांनी पाण्याचा साठा केला तर डेंग्यूचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिक दुहेरी कोंडीत सापडले आहेत.
पाणीपुरवठा विभागाचे अपयश
पाणीटंचाई निवारणाबाबत पालिका प्रशासन काहीही उपाययोजना करताना दिसत नाही. पाणी पुरवठ्याबाबत पर्यायी उपाययोजना, पूर्वनियोजन याबाबतचे कुठलेही प्रयत्न उल्हासनगर महानगरपालिकेचा पाणीपुरवठा विभाग करत नसल्याचा आरोप ‘कायद्याने वागा लोकचळवळ’चे संस्थापक राज असरोंडकर यांनी केला आहे. पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक घुले यांच्या नियोजनशून्य कारभारावरही त्यांनी टीका केली.




























































