वीज ग्राहकांसाठी महावितरणचा स्वागत सेल ; वीज जोडणी, वाढीव भारासाठी संपर्क साधल्यास अधिकारी घरपोच सेवा देणार

राज्यातील औद्योगिक ग्राहकांना दर्जेदार सेवा देण्यासाठी महावितरणने स्वागत सेल सुरू केला आहे. त्यानुसार एखाद्या औद्योगिक ग्राहकाने नवीन वीज जोडणी मागितल्यास वाढीव भारासाठी संपर्क साधल्यास किंवा वीज बिलाबाबत काही तक्रार असेल तर महावितरणचे अधिकारी ग्राहकाच्या घरी जाऊन कागदपत्रांची पूर्तता करण्याबरोबरच विनाविलंब सेवा देणार आहेत. त्यामळे औद्योगिक ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

राज्यासह महावितरणच्या महसुलाचा प्रमुख स्रोत म्हणून औद्योगिक ग्राहकांकडे पाहिले जाते. महावितरणच्या एकूण महसुलात औद्योगिक ग्राहकांचा तब्बल 46 टक्के वाटा आहे. औद्योगिक ग्राहकांचे प्रमाण दरवर्षी सुमारे 3 टक्क्यांनी वाढत आहे. त्यामुळे त्यांना चांगल्या सेवा देण्यासाठी स्थानिक पातळीवर स्वतंत्र सेवा देणारी यंत्रणा तयार करण्याची सूचना व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिल्या होत्या. त्यानुसार प्रत्येक जिह्यात स्वागत सेलची स्थापना करण्याचे निर्देश सर्व विभागीय कार्यालयांना महावितरणने दिले आहेत.