शहिदांच्या कुटुंबांचा आक्रोश सुरू होता, मोदींवर फुलांचा वर्षाव सुरू होता

जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत हिंदुस्थानी लष्कराचे कर्नल, मेजर, डीएसपी यांच्यासह चार जवान बुधवारी हुतात्मा झाले. ही दुर्दैवी घटना समजताच संपूर्ण देशभरात हळहळ व्यक्त केली जात असतानाच दुसरीकडे हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर भाजपच्या मुख्यालयात फुलांचा वर्षाव केला जात होता. त्यांचे अभिनंदन केले जात होते. इतकी मोठी दुर्दैवी घटना होऊनही त्याबद्दल चकार शब्द न बोलता सत्तेत मश्गूल असणाऱया भाजप आणि मोदी यांच्याविरोधात आता संतापाची लाट उसळली आहे.

जी-20 शिखर बैठक यशस्वी झाल्याचे निमित्त साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर भाजप नेत्यांकडून फुलांची उधळण केली जात होती. या घटनेमुळे संपूर्ण हिंदुस्थानात भाजप आणि मोदी यांच्याविरोधात संतापाची लाट उसळली आहे. भारतवर तत्काळ ट्विट करणारे बॉलीवूड अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांनी जवान शहीद झाल्यानंतर एक तरी ट्विट केले का? जवान शहीद झाल्यानंतर मोदी यांनी जी-20 चा उत्सव साजरा करणे योग्य होते का? असा सवाल सोशल मीडियावरून विचारला जात आहे.

दहशतवाद्यांना घेरले

कोकोरेनाग येथील जंगलात दडलेल्या एलइटीच्या दोन दहशतवाद्यांना पोलिस आणि लष्कराच्या पथकांनी घेरले असून यातील एक उझेर खान हा स्थानिक दहशतवादी आहे. त्यांना पकडण्यासाठी आणखी कुमक या डोंगराळ भागात आणण्यात आली असून, ड्रोन आणि हेलिकॉप्टरद्वारेही रात्रीपासून परिसरात नजर ठेवण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका खबरीने दिलेल्या माहितीनुसार ही मोहीम आखण्यात आली होती.

शहीदांना अखेरचा निरोप

कोकोरेनाग भागातील घनदाट जंगलात बुधवारी झालेल्या चकमकीत वीरमरण आलेले कर्नल मनप्रीत सिंग, मेजर आशीष धोनचक, पोलीस उपअधीक्षक हुमायून भट यांच्या पार्थिवांवर गुरुवारी शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले. दरम्यान, समाज माध्यमांवर त्यांच्या हौतात्म्याला अभिवादन करणाऱया नेटकऱयांमध्ये दहशतवादी आणि पाकिस्तान यांच्याबद्दल संतापाची एकच लाट उसळली आहे.

शहीद जवानांचे कुटुंब मुलाचा आक्रोश करत होते. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी मध्य प्रदेशातील सभेतून भाजपसाठी मतदान मागत होते. – काँग्रेस

ज्यावेळी पंतप्रधान मोदींवर भाजप नेत्यांकडून फुलांची उधळण केली जात होती, त्यावेळी जवानांवर दहशतवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार केला जात होता. – रोहित चौधरी, माजी कर्नल