केळशीमधील श्री महालक्ष्मीचा यात्रोत्सव उत्साहात साजरा

कोकण निसर्ग आणि समुद्र किनाऱ्यांसाठी प्रसिद्ध असला तरी आजही कोकणामध्ये देवी देवतांची तितक्याच श्रद्धेने पूजाअर्चा केली जाते. यात्रेच्या निमीत्ताने चाकरमानी मोठ्या संख्येने कोकणात दाखल होत असतात. धावपळीच्या जीवनात परंपरांशी नाळ जोडण्याची कसरत कोकणी माणूस आत्मियतेने करत असतो. असाच एतिहासिक परंपरा असलेला दापोली तालुक्यातील केळशी येथील श्री महालक्ष्मी देवीच्या रथाचा यात्रोउत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला.

केळशी हे दापोली तालुक्यातील ऐतिहासिक महत्व असलेले गाव आहे. या गावाला शुरवीरांची परंपंरा आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी दोपलीला तीन वेळा भेट दिल्याची इतिहासात नोंद आहे. तसेच छत्रपती संभाजी महाराज यांनी दोन वेळा, थोरले बाजीराव पेशवे यांनी एकवेळा तर शंकरचार्यांनी केळशी गावाला भेट दिल्याचे सांगितले जाते. मराठेशाहीतील शुर सरदार लागू, बिवलकर, केळकर, जोग, हरपिंत फडके इत्यादी हे सर्व केळशी या गावातलेच.

एतिहासिक महत्त्व असलेल्या महालक्ष्मी देवीच्या रथाच्या यात्रोत्सवामध्ये सुद्धा सामाजीक ऐक्याची अनुभती पाहायला मिळते. सर्व जाती जमातीचे लोक या यात्रोत्सवामध्ये एकजुटीने आपापली जबाबदारी पार पाडतात. रथ सजविण्याचा मान शिंपी समाजाचा, रथावर लागणारा आरसा लावण्याची जबाबदारी नाभिक बंधुंवर आणि गोंधाळासाठी लागणारी छोटी विशिष्ट पद्धतीची मडकी कुंभार समाजाची लोक पुरवतात. तसेच मांडव घालणे, जमीनी करणे ही कामे माळी व कुणबी समजाचे लोक करतात. अशापद्धतीने सर्व जाती जमातींची लोक या उत्सवात सहभागी होतात. या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे ही सर्व कामे फक्त मानाच्या विड्यावर केली जातात. त्यामुळे कुठल्याही प्रकारचे राजकारण या उत्सवामध्ये पाहायला मिळत नाही.

श्री महालक्ष्मी वार्षिक रथोत्सव चैत्र शुद्ध अष्टमी ते चैत्र शुद्ध पौर्णिमा या काळामध्ये साजरा केला जातो. एकादशीपासून पौर्णिमे पर्यंतचे दिवस हे जास्त महत्वाचे मानले जातात. या दिवसांमध्ये प्रत्येक घरासमोर अंगणात बिदांगण घालण्याची प्रथा आहे. तसेच देवीला कायमच मुखवास चढवलेला असतो. या उत्सवाची सुरूवात गोंधळाने होते. विशेष म्हणजे चंद्र उदय व अस्त यावर गोंधळ सुरू करणे म्हणजे चढवणे व उतरवणे हे ठरलेले असते. गोंधळानंतर किर्तन सुरू होते आणि गोंधळ उतरण्यापूर्वी ते संपते. हा गोंधळाचा प्रकार प्रचलित गोंधळासारखा नसून एक गायन प्रकार असतो. त्यातील कवने विशिष्ठ लयींनी गावून सर्व देवतांना सुरूवातीला येण्याचे आवाहन व उतरताना निरोप दिला जातो.

मुख्य सभा मंडप चौसुपी आकाराचा असून तो हंडया झुंबरे कापडी कमानी तस्वीरी वगैरेंनी सजवला जातो. देवळात विज असूनसुध्दा या मंडपात तेलांच्या दिव्यांच्या पणत्यांचीच आरास केली जाते. त्यामुळे मंडपाचे दृष्य फार विहंगम दिसते. श्री.महालक्ष्मी उत्सवाच्या मुख्य दिवशी देवीची रथातून भव्य मिरवणूक निघते ज्या रथातून ही मिरवणुक निघते. यावर्षी मुलांच्या वार्षिक परिक्षा झाल्या आहेत त्यामुळे पूणे, मुंबई, ठाणे आदी शहरात नोकरी धंदा व्यवसायानिमित्त राहणारे चाकरमानी मोठया संख्येने केळशी या आपल्या गावात दाखल झाले आहेत. केळशी येथील श्री महालक्ष्मी देवीला मानणारा भक्तगण वर्ग फक्त केळशी या गावापुरताच मर्यादीत नाही. त्यामुळे केळशी पंचक्रोशि परिसरातील आंबवली बुद्रुक, आतगाव रोवले, उंबरशेत, उंटबर, आडे, मंडणगड तालूक्यातील केळास, खार, साखरी, आंबवली, जावळे आदी गावातील लोक मोठया संख्येने दाखल होतात.