अभिनेत्री झरीन खानला दिलासा, न्यायालयाने दिला महत्वाचा निकाल

बॉलीवूड अभिनेत्री झरीन खानला न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळालेला आहे. फसवणूक प्रकरणात तिला अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. मात्र हे अटक वॉरंट कोलकाता दंडाधिकाऱ्यांनी रद्द केले आहे.

कथित फसवणूक प्रकरणात झरीनच्या विरोधात 2018 साली अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. आता कोलकाता दंडाधिकाऱ्यांनी हे वॉरंट रद्द केले आहे. कोलकात्याच्या सियालदह कोर्टातून अभिनेत्रीविरोधात हे वॉरंट जारी केले होते. कथिक फसवणूक प्रकरणी झरीन खानने ना जामिनासाठी अपिल केले होते आणि ना तिने न्यायालयात उपस्थिती लावली. त्यामुळे न्यायालयाने तिच्याविरोधात अटक वॉरंट जारी केला होता. यामुळे झरीन अनेक दिवसांपासून कायद्याच्या कचाट्यात अडकली होती. आता तिला दिलासा मिळाला आहे. तपास अधिकाऱ्यांना दिशाभूल करणारी माहिती दिल्यामुळे अभिनेत्रीविरोधात वॉरंट जारी करण्यात आल्याचे बोलले जात आहे. झरीन खानने तिच्याविरुद्ध वॉरंट जारी केल्यावर आश्चर्य व्यक्त केले होते.