ठसा – शेतात राबणारा कृषी अधिकारी

>> दुर्गेश आखाडे

कृषी अधिकारी म्हणून फक्त टेबलावर बसून शेतीचे कागद न रंगवता राजापूर तालुक्यातील सोलगाव गावात वडिलोपार्जित 20 एकर जमिनीमध्ये शेतकरी म्हणून राबण्याचे काम सेवानिवृत्त कृषी अधिकारी सुहास शरद पंडित यांनी केले. सुहास पंडित यांनी रत्नागिरी आणि रायगड जिह्यांतील पंचायत समितीमध्ये कृषी अधिकारी म्हणून काम केले आहे. कृषी अधिकारी म्हणून काम करत असतानासुद्धा शेतीची ओढ त्यांना शांत बसू देत नव्हती. वडील शरद पंडित यांनी घेतलेल्या 20 एकर जमिनीमध्ये त्यांनी फावल्या वेळेत राबायला सुरुवात केली. सेंद्रिय शेती करताना ‘विषमुक्त अन्न’ ही एक संकल्पना त्यांनी राबवली आहे. तसेच गव्य उत्पादनातूनही त्यांनी पशुपालन करणाऱयांना रोजगाराचा नवा मार्ग दाखवला आहे.

सुहास पंडित यांनी सोलगाव येथील त्यांच्या शेतात भात, आंबा, काजू, नारळ, सुपारी, मसाल्याची पिके, जायफळ, दालचिनी, काळीमिरी, त्याचबरोबर कोकम, अननस, सूर्यफूल आणि काही भाजीपाल्याची लागवड सुरू केली. विशेष म्हणजे ही सर्व शेती ते सेंद्रिय पद्धतीने करतात. रासायनिक पद्धतीने शेती करत असताना त्यातून होणारा खर्च आणि मिळणारे कमी उत्पन्न याचे गणित त्यांनी जाणले होते. त्यामुळे रासायनिक शेतीपेक्षा विषमुक्त अन्न निर्माण करण्यासाठी त्यांनी सेंद्रिय शेतीचा अवलंब सुरू केला. 2014 पासून ते सेंद्रिय शेती करत आहेत. सेंद्रिय शेतीसाठी लागणाऱया सेंद्रिय खताची निर्मिती सुहास पंडित स्वतः करतात.

पंचगव्य उत्पादने हे सुहास पंडित यांचे आणखी एक वैशिष्टय़. कोकण गिड्डा या देशी गायीपासून ते गव्य उत्पादने घेतात. गव्य उत्पादने म्हणजे गोमूत्र, शेण, दूध, दही, तूप, ताक यापासूनची उत्पादने होय. मानवी आरोग्य चांगले राखण्यासाठी ही गव्य उत्पादने उपयोगी पडतात. अनेक आयुर्वेदिक औषधांची निर्मिती या गव्य उत्पादनांतून सुहास पंडित करतात. अर्क, घनवटी, चूर्ण, मलम, स्प्रेसह दंतमंजन, धूपकांडी, तेल, साबणाची निर्मिती ते करतात. गायीच्या शेणापासून अनेक वस्तू ते बनवतात. त्यामध्ये मूर्ती, पणत्या, विविध आकर्षक भेटवस्तू तयार करतात. गायीच्या शेणापासून आणि एक अभिनव उपक्रम त्यांनी राबवला आहे, तो म्हणजे मोबाइलचे रेडिएशन कमी करणारी गायीच्या शेणापासून त्यांनी चीप बनवली आहे. ही चीप मोबाइलच्या कव्हरमध्ये ठेवल्यानंतर मोबाइलचे रेडिएशन रोखण्याचे काम करते. ही मोबाइल चीप ते शंभर रुपयांना विकतात. गव्य उत्पादनांमुळे गोपालनाला प्रोत्साहन मिळते. सुहास पंडित यांच्याकडून अनेक जण गव्य उत्पादने विकत घेतात. ज्यांनी या गव्य उत्पादनाचे महत्त्व जाणले आहे ते लोक सुहास पंडित यांच्याकडून ही गव्य उत्पादने मागवून घेतात. गव्य उत्पादनामुळे गोपालनाला हातभार लाभतो. गोपालनातून गव्य उत्पादने रोजगाराचे मार्ग दाखवतात. त्यामुळे शेतकऱयांनी गव्य उत्पादनाकडे वळावे याकरिता सुहास पंडित पंचगव्य उत्पादने बनवणे आणि चिकित्सा या विषयावर प्रशिक्षण देतात. अॅडव्हान्स डिप्लोमा इन पंचगव्य थेरपी हा एक वर्षाचा प्रशिक्षण अभ्यासक्रम सोलगाव येथे शिकवला जातो. तामीळनाडू राज्यातील कांचीपुरम येथील पंचगव्य गुरुकुलमशी हा अभ्यासक्रम संलग्न आहे. पंचगव्य गुरुकुलमची एकूण 23 पेंद्रे आहेत. त्यामध्ये सोलगाव येथील केंद्राचा समावेश आहे. आतापर्यंत शंभरहून अधिक जणांनी हा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. काहींनी पंचगव्य उत्पादने सुरू केली आहेत. 31 डिसेंबर 2023 ला सुहास पंडित सेवानिवृत्त झाले आहेत. आता पूर्ण वेळ ते शेतात राबतात. त्यांच्यासोबत चार-पाच कामगारही मदतीला असतात. सुहास पंडित आता एप्रिल महिन्यापासून ते अॅग्रो टुरिझम सुरू करणार आहेत.