…तर इंग्लंड पहिला जगज्जेता नव्हे

श्रीलंकेविरुद्धच्या मानहानीकारक पराभवामुळे जगज्जेत्या इंग्लंडचं वर्ल्ड कपमधील आव्हान जवळजवळ संपुष्टात आले आहे. फक्त त्याची औपचारिक घोषणा उरलीय. पण वर्ल्ड कपच्या इतिहासात साखळी सामन्यातच गारद झालेला किंवा उपांत्य फेराही गाठू न शकलेला इंग्लंड हा पहिलाच जगज्जेता नाही. याआधी अशीच नामुष्की ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यावरही ओढावली होती.

गेल्या वेळच्या वर्ल्ड कपमध्ये हिंदुस्थान केवळ इंग्लंडविरुद्ध हरला होता आणि 7 विजय मिळवूनही नेमका उपांत्य फेरीत न्यूझीलंडकडून मात खाल्ली होती. हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलियाने प्रत्येकी 7-7 सामने जिंकले होते. उपांत्य सामन्यात हिंदुस्थानची गाठ न्यूझीलंडशी पडली, जो केवळ 5 विजयानिशी उपांत्य फेरीत पोहोचला होता आणि साखळीत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा पराभव केला होता. नेमकं उपांत्य फेरीत उलटं झालं. इंग्लंडने बाजी मारली आणि ते अंतिम फेरीत पोहोचले. अंतिम फेरीत नेमकं काय झालं ते अवघ्या जगाने पाहिलं. सांगायचं तात्पर्य हे की, साखळीतील कामगिरी उपांत्य फेरीत दिसली नव्हती.

गतवर्षी जगज्जेता ठरलेला इंग्लंड गेली दोन वर्षे सुसाट खेळतोय. पण या वर्ल्ड कपमध्ये त्यांच्या खेळाडूंनी अक्षरशः माती खाल्लीय. जगज्जेतेपद राखण्यात त्यांना अपयश येणार हे निश्चित झालं असलं तरी त्यांची कामगिरी अत्यंत निराशाजनक ठरलीय.

आजवर वेस्ट इंडीज आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघांनाच जगज्जेतेपद राखण्यात यश लाभले आहे. 1975 चा जगज्जेता वेस्ट इंडीज 1979 सालीही जगज्जेता ठरला. तर 1999 साली जगज्जेतेपद पटकावणाऱया ऑस्ट्रेलियाने 2003 आणि 2007 अशी हॅटट्रिक करत अनोखा विक्रम रचला.

1983 साली जगज्जेता ठरलेला हिंदुस्थान 1987 साली उपांत्य फेरीत हरला, पण या स्पर्धेत अजिंक्य ठरलेला ऑस्ट्रेलिया 1992 साली मायदेशातच झालेल्या स्पर्धेत साखळीतच बाद झाला. याला म्हणतात नशीब. यजमान साखळीतच बाद होण्याची ही पहिलीच वेळ होती. 1996 साली हिंदुस्थानात झालेल्या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान उपांत्य फेरीपर्यंत पोहचू शकला नाही. उपउपांत्य फेरीतच ते पराभूत झाले. 1999 साली जगज्जेत्या श्रीलंकेलाही साखळीतच पराभव सहन करावा लागला. त्यानंतर जगज्जेत्या संघावर साखळीतच गारद होण्याचा प्रसंग ओढावला नव्हता. जो तब्बल दोन दशकांनंतर इंग्लंडवर ओढावला आहे. इंग्लंडचा खेळ पाहता त्यांच्याकडून चमत्काराची अपेक्षा नाही. त्यामुळे साखळीतच संपणारा इंग्लंड पहिला जगज्जेता नसेल.