पश्चिम उपनगरातील पुलांच्या मजबुतीसाठी 87 कोटींचा खर्च

पश्चिम उपनगरातील सुमारे दीडशे पुलांच्या मजबुतीसाठी पालिका 87 कोटी 28 लाखांचा खर्च करणार आहे. यामध्ये पुलांचा पाया मजबूत करणे, पृष्ठीकरण, बेअरिंग बदलणे आणि आवश्यक डागडुजीची कामे केली जाणार असल्याची माहिती पालिकेच्या पूल विभागाकडून देण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाजवळील हिमालय पूल 2019 मध्ये कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे मुंबईतील पुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. त्यामुळे पालिकेच्या माध्यमातून मुंबईभरातील पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून आवश्यक त्या ठिकाणी डागडुजी-दुरुस्ती आणि जीर्ण पूल तोडून नव्याने बांधण्यात येत आहेत. यामध्ये ‘आयआयटी’च्या सूचनेनुसार शहरातील 15 पुलांची दुरुस्ती करण्यात आल्यानंतर  पूर्व उपनगरातील कुर्ला, चेंबूर, मानखुर्द, घाटकोपर, विक्रोळी, कांजुरमार्ग, भांडुप, मुलुंड येथील पुलांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. यासाठी पालिका 42 कोटी रुपये खर्चणार आहे. तर आता पश्चिम उपनगरातील पुलांची दुरुस्ती करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. यासाठी आज निविदा मागवण्यात आल्या.

अशी होणार दुरुस्ती

झोन – 3

सांताक्रुझ पूर्व, कांद्रे पश्चिम, अंधेरी पश्चिम

खर्च – 24 कोटी 67 लाख 37 हजार 504

कामाचा कालावधी – पावसाळय़ासह 18 महिने

झोन – 4

बोरिवली, दहिसर, अंधेरी पश्चिम

खर्च – 35 कोटी 79 लाख 2 हजार 850

कालावधी – पावसाळय़ासह 18 महिने

आर दक्षिण – कांदिवली

खर्च – 7 कोटी 19 लाख 93 हजार 55 रुपये

कालावधी – पावसाळय़ासह 15 महिने

आर मध्य – बोरिवली

खर्च – 12 कोटी 27 लाख 22 हजार 560

कालावधी – पावसाळय़ासह 24 महिने

आर उत्तर दहिसर

खर्च – 6 कोटी 63 लाख 51 हजार 205

कालावधी – पावसाळय़ासह 15 महिने