
पश्चिम रेल्वे मार्गावर पुढील महिन्यात आणखी एक एसी लोकल दाखल होणार आहे. त्या नव्या एसी लोकलच्या किमान 12 फेऱया चालवण्याचे नियोजन केले जात आहे. साध्या लोकल फेऱयांच्या जागी एसी लोकल चालवली जाणार आहे. त्यामुळे एसी लोकल फेऱयांची संख्या 133 पर्यंत वाढणार असून साध्या (नॉन-एसी) लोकलच्या फेऱया घटणार आहेत. याचा फटका बसून सर्वसामान्य प्रवाशांचे हाल वाढणार आहेत. नवीन एसी लोकल पश्चिम रेल्वेच्या वेळापत्रकात समाविष्ट केल्यानंतर साध्या लोकलच्या सेवेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रशासन एसी लोकल फेऱया वाढवत आहे. मात्र सामान्य प्रवाशांच्या होणाऱया गैरसोयीकडे दुर्लक्ष करीत आहे, अशी नाराजी महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघाचे पदाधिकारी राजेश पंडया यांनी व्यक्त केली.




























































