
वर्धा नदीपात्रातील रेती उत्खननाच्या सीमांकनाच्या वादातून दोन गटांत झालेल्या हिंसक हाणामारीत एकाचा मृत्यू झाला. या घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले तर पाचपेक्षा अधिक वाहनांची तोडफोड करण्यात आली. रविवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. भरत नागपाल असे मयताचे नाव असून पुलगाव येथील भाजपचा महामंत्री होता.
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील वर्धा नदीवरील बामर्डा परिसर तसेच वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील वडनेर परिसरातील ढीवरी-पीपर रेती घाटांचा शासनाने अधिकृत लिलाव करून संबंधित एजन्सींना रेती उत्खननाचे काम दिले आहे. दोन्ही अधिकृत घाट वर्धा नदीच्या पात्रात असल्याने उत्खनन करताना सीमांकनावरून यापूर्वीही वाद होत होते. रात्री हा वाद अचानक चिघळला आणि दोन्ही गट आमनेसामने आले. लाठ्या-काठ्यांनी झालेल्या हाणामारीत एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले.
जखमींना उपचारासाठी हिंगणघाट येथील स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत तिघांना अटक केली असल्याचे सांगितले आहे. प्राथमिक तपासात ही हत्या वाळू व्यवसायातील अंतर्गत संघर्षातून झाल्याची माहिती पोलिसांकडून समोर आली आहे. हत्येमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पुढील तपास सुरू आहे.




























































