IPL 2026 – तळ राखील तो बाहेर जाईल! चेन्नई-कोलकात्यात आज संघर्ष

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एकेकाळी अंतिम फेरी गाजवणारे चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स आज तळाच्या स्थानावरून बाहेर पडण्यासाठी धडपडत आहेत. विजेतेपदांची परंपरा असलेले हे दोन्ही संघ आता अस्तित्वाच्या काठावर उभे आहेत. चेन्नईने चारपैकी एकच सामना जिंकला, तर कोलकात्याला अजून विजयाचा सूर सापडलेला नाही. पाचवा सामना खेळत असलेल्या या दोन्ही संघांना चेपॉकवरचा पराभव तळाला कायम ठेवेल. त्यामुळे जो तळ राखील त्या संघावर आतापासून स्पर्धेबाहेर फेकले जाण्याचे संकट ओढवणार आहे.

या दोन्ही संघांनी काही आपले खेळाडू गमावले, तेच खेळाडू आता जोरदार खेळत आहेत. हे गमावणे अपघाताने नाही, तर लिलावातील चुकीच्या निर्णयाने झाल्याचे उघड झाले आहे. कोलकात्याने श्रेयस अय्यरला सोडून अजिंक्य रहाणेवर डाव टाकला, तर चेन्नईने समीर रिझवीला गमावले. आता त्याची किंमत दोन्ही संघांनाही चुकवावी लागतेय.

दोन्ही संघ उद्या आपला पाचवा सामना खेळणार आहेत. या सामन्यात पराभव म्हणजे थेट ‘करो या मरो’चा मार्ग. मात्र संजू सॅमसनच्या धडाकेबाज फॉर्ममुळे चेन्नईला थोडी आघाडी मिळाली आहे. त्याच्या आक्रमक फलंदाजीने संघाला नवसंजीवनी दिली आहे. चेन्नई आता संतुलित दिसतोय. डेवाल्ड ब्रेविसने मधल्या फळीला धार दिली, तर गुरजपनीत सिंगने संधी साधली. दुसरीकडे कोलकाता अजूनही योग्य गोलंदाजीची वाट पाहतोय.

उद्या खरी नजर असेल ती ऋतुराज गायकवाड आणि अजिंक्य रहाणेवर. गायकवाडचा संथ खेळ टीकेचा विषय ठरतोय, तर आयुष म्हात्रे 180 च्या वेगाने धावा ठोकत त्याला सरळ आव्हान देतोय. रहाणे धावा करतोय, पण त्याला टी-20चा वेग मिळत नाहीय आणि टी-20मध्ये वेगच सर्वकाही आहे. हा सामना फक्त सामना नाही, तर ही अस्तित्वाची लढाई आहे.  जिंकणारा टिकणार आणि हरणारा मागे पडणार. त्यामुळे कोण तळाला राहतो आणि कोण उठण्याचा प्रयत्न करतो याकडे सर्वांचे लक्ष लागलेय.